Category Archives: कविता

श्रीराम जन्म कथा

 श्रीराम जन्म कथा

 

श्रीरामाचा अवतार   दुष्टांचा करण्या संहार

जन्म घेतला पृथ्वीवर   परमेश्वरानी  //१//

रामासी लाभले मोठेपण   तयाठायीं तन मन धन

अर्पिती सर्व भक्तजन   प्रेमभरे    //२//

थोर ग्रंथ रामायण  त्यातील जन्मकथा निवडून

करीत असे अर्पण   तुमचेसाठीं   //३//

लंकाधीपती रावण   होता शिवभक्त महान

उन्मत्त झाला वर पावून   त्रास देई सर्वाना   //४//

युद्ध केले स्वर्गासी   बंदी केले देवांसी

छळूं लागला तयांसी   दुष्टपणानें   //५//

रावणाच्या त्रासा पोटीं   देवांच्या मुक्तीसाठीं

अवतार घेई जगत् जेठी   श्रीराम जन्म घेऊनी   //६//

आयोध्येचा दशरथ राजा   आनंदी होती प्रजा

सुखी बघण्यात मजा   त्यास वाटे   //७//

एक दुःख होते त्यास   पुत्राविना जात दिवस

पुत्र प्राप्त करण्यास   प्रयत्न केले बहूत //८//

राजा जाई वशिष्ठ गुरु कडे   घालूनी त्यास साकडे

पुत्राविना वंश न वाढे   मार्ग सुचवावा   //९//

वशिष्ठ गुरु सुचविती   यज्ञ करण्या सांगती

पुत्रकामेष्टी यज्ञ महती   आगीच असे   //१०//

गुरुंचा आशिर्वाद घेऊनी    राजा निघाला तेथून

संकल्प केला दशरथांनी   पुत्रकामेष्टी यज्ञाचा   //११//

श्रृंगऋषी महान   होते तप सामर्थवान

विनवितसे जाऊन   त्यांचे आश्रमी   //१२//

पाद्यपुजा त्यांची करुनी   भक्तिभावे विनवूनी

यज्ञासाठीं पाचारण करुनी   तयासी बोलावले   //१३//

मंडव घातला भला   यज्ञाचा भव्य सोहळा

ऋषीगण ब्राह्मण सगळा   यज्ञासी जमती   //१४//

यज्ञांत आवाहन केले   सर्व देव निमंत्रिले

हविर्भाव सर्वासी दिले   श्रृंगऋषीनें   //१५//

स्पष्ट मंत्रोपचार म्हणून   सर्व ऋषी एकसूर धरुन

अग्नीसी टाकती हवन   राजा दशरथ   // १६//

प्रसन्न झाली यज्ञदेवता   पायस कलश हातीं देता

समान भाग राण्यांस वाटता   पुत्र प्राप्त होई   //१७//

दशरथाच्या राण्या तीन   कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान

आनंदी झाल्या पायस बघून   यज्ञाचा प्रसाद   //१८//

कैकयी बसली रुसून   पट्टराणी मी लहान असूनी

प्रथम भाग कौसलेस देवून   अपमान माझा होई   //१९//

प्रसाद घेवूनी बैसली   मनीं विचार करुं लागली

तत् क्षणी एक घार आली   प्रसाद जाई घेऊन   //२०//

सर्वजण होती चकीत   कांही समजण्याचे आंत

एक भाग घार नेत   आकाशी उडाली   //२१//

कैकयी झाली दुःखी    शब्द निघेना मुखी

प्रसंग ओडावला एकाएकीं     तिचेवर   //२२//

आपल्या प्रसादातील भाग   देवून कैकयीस सांग

सोडून द्यावा तुझा राग   विनवितसे दोन्ही राण्या  //२३//

चैत्रशुद्ध नवमीला   राम जन्म झाला

कौसल्या मातेला   आनंद होई त्रिभुवनी   //२४//

सुमित्रेचा लक्ष्मण   कैकयीस भरत शत्रुघ्न

चार पुत्र मिळून   पितृत्व दिले दशरथासी   //२५//

आदर्श जीवन जगला   पितृआज्ञे वनवास सोसला

मारिले दुष्ट रावणाला   यशस्वी केले रामराज्य   //२६//

रामाचा महीमा थोर   परमेश्वराचा तो अवतार

भक्तांचा करी उद्धार    त्याचे आशिर्वादे    //२७//

एक पत्नी, वचनी, बाणी    सत्य आणि  प्रेमळ वाणी

अद्वितीय गुणांच्या खाणी    रामासी ठरवी पुरुषोत्तम   //२८//

रामाचे जीवन भव्य   आदर्शमय ते काव्य

दाखवोनी जगाला दिव्य    ठाव घेई सर्वा मना   //२९//

रामनामी मोठेपण   जाईल तो उद्धरुन

संकटे जात निघून   आठवण येता त्याची   //३०//

रामरक्षा स्तोत्र पठण   करी तुमचे देह रक्षण

नित्य नियमें वाचन    मनोभावें   //३१//

” शुभं भवतु “

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

जगाचा निरोप

जगाचा निरोप

 

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना

निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना

वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी

नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी

जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें

मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे

प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं

पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य नाहीं

उर्वरीत आयुष्याची रेखा,  मर्यादेतच आखूनी काढी

समज येतां प्रभूचे सारे,   समर्पण करीत जग सोडी

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

कविता स्फूर्ति

कविता स्फूर्ति

 

पूर्णणें मज पटले आतां

कविता कुणी करवून घेतो

कोण असेल तो माहित नाहीं

मजकडून तो लिहून घेतो

 

घ्यानी मनीं कांहींही नसतां

विषय एकदम समोर येतो

भाव तयांचे जागृत होऊन

शब्द फुले ती गुंफून जातो

 

एका शब्दानंतर दुसरे

आणि तिसरे, लगेच चौथे

शब्दांची ती भरुनी ओंजळ

माझ्या पदरीं कुणी टाकतो

गुंफण करुनी हार बनता

त्याजकडे मी बघत असे

फक्त प्रभूचे नाम घेऊनी

अर्पण त्याला करीत असे

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बालपणीची भांडणें

बालपणीची भांडणें

 

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें

मला पाहीजे जास्त,  हेच मुख्य मागणें

इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार

दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार

क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें

दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें

राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं

स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी

बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते

चव येण्या पदार्थाला,  तिखटमिठ लागते

लहान असतां भांडून घ्या,  तेच वय भांडणाचे

मोठे होऊन आठवाल,  रम्य दिवस ते बालपणाचे

 (कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

कोण हा कलाकार ?

कोण हा कलाकार ?

 

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य

अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय

थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं

विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी

बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे

प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे

ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी

सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई

निसर्गातील प्रत्येक अंगी,   भरलाआहे सौंदर्य ठेवा

आंस राहते लागून मनीं,   कलाकार श्रेष्ठ तो जाणावा

(कविता)

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

होळीत जाळा दुष्ट भाव

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारे जण   विसरुन जाऊं भेदभाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ//

ऐष आरामांत राहून    देह झाला मलीन

शरीर सुखासाठीं     करती नाना खटपटीं

आज आहे सण होळीचा   नष्ट करा आहीक भाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //१//

मन असे चंचल भारी   सर्व दिशेनी घेई भरारी

राग लोभ अहंकार     मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीमध्यें, घे धांव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव     //२//

विसरुन चाललो मानवता     प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नातें    विसरुन गेले सारे ते

निःस्वार्थ बुद्धीने आंता जाणा इतर मनांचे ठाव

जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव    //३//

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

निसर्ग सुख!

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे

रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?

निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं

निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं

केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य

आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य

मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें

निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

परावलंबी

परावलंबी

 

जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी

व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी

नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या

शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या

माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता

तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता

घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी

समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी

वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा

हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा

मृतदेह जर तसाच पडला,  किडे मुंग्या खाती

त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती

जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन

कुणी तरी दिले तुजसाठीं,  हे घे जाणून

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

पेराल तसे उगवते

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें    अंकूर फुटती

असतील दाणे जसे    तेच उगवती

पेरता आनंद      आनंदचि मिळे

प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे

शिवीगाळ करुनी    आदर येई कसा

शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा

घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम

क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम

पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा

सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

मी कसा जगू आता?, ते तुम्हीच ठरवायच?

मी कसा जगू आता?, ते तुम्हीच ठरवायच?

 

ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ//

**   शेजारचा छेड छाड करतो

पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली

पोलिसानेच बलात्कार केला ,   म्हणून रडत घरीं आली

रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मानायचं   //१//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    बापाने दिलेल्या फ्लॅटवर ,    घर बांधण्याची योजना आखली

नगरपालिकेच्या परवानग्या,      ह्यातच जीवनाची कमाई संपली

माझ्या श्रमाचा पैसा,   दुजा खर्चताना बघायचं   //२//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    पोटाच्या विकारसाठी,    हॉस्पिटलमध्ये भरती झालो,

विकार तेथेच राहिला,     चांगली किडनी मात्र गमावून बसलो,

डॉक्टरांचे स्वार्थी कर्म बघीतले, तर आरोग्यासाठी कुठे जायच  //३//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    कृत्रिम तेल तूप,     खाण्यापीण्याचीही भेसळ

न दया माया प्रेम,     आयुष्याचा करतात खेळ

निर्दयी बनलेली जीवन मुल्ये बघायचं //४//

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

**    तुला जगायचंय ना ?

फक्त विचारावर जग

भावनेला कायमची मुठ माती दे

न सुख न दुःख, दोन्हीही सारखेच वाटतील

एखाद्या रोबाट प्रमाणे काम करीत मरुन जा

कशासाठी ? आणि   कां ?   असले प्रश्न करु नकोस

जग बदलतय, सवय करुन घे अशाच जगण्याची

तुला जगायचंय, तेंव्हां हे पण तुलाच ठरवायच //५//

तू कसा जगशील आता ?, ते तुलाच ठरवायच ?

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०