Category Archives: कविता

* बागेतल्या तारका

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी

रात्र पडुनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १

बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे

लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे         २

अगणित बघुनी  संख्यावारती     प्रसन्न झाले मन

किती वेळ तो निघुनी गेला        राहिले नाही भान      ३

शितलेतेच्या  वातावरणी           शांत झोप लागली

नयन उघडता बघितले मी      पहाट ती झाली            ४

गेल्या निघून सर्व तारका       आकाशाला सोडूनी

शोधू लागले नयन माझे         त्यांना सर्व दिशांनी         ५

चकित झालो फुले बघुनि मी      सुंदर फुललेली

सुचवित होती मिश्कील्तेने          का तारकांच खाली ?    ६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

व्यसनासक्ति विषयी !

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !

लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद

अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य

एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत

होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी

नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी

जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो

प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो

सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना

घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

// सती सावित्री // ( अर्थात वटपौर्णिमा व्रत )

//  सती सावित्री  //

( अर्थातd वटपौर्णिमा व्रत )

 

स्त्री जातीचा मुकुटमणीं    महासती मान मिळोनी

धन्य झाली जीवनीं    पतीव्रता सावित्री   //१//

ब्रह्मा लिखित अटळ   ह्या सूत्रीं केला बदल

हे तिच्या तपाचे फळ   सावित्रीने मिळविले   //२//

जरी येतां काळ   चुकवावी वेळ

बदलेल फळ    हेच दाखविले तीने   //३//

समजण्या धर्म पतिव्रता   ऐकावी सावित्री कथा

मनीं भाव भरुनी येतां   आदर वाटे तिच्या परीं   //४//

मद्रदेशाचा नृपति   नांव तयाचे अश्वपति

कन्या त्याची सावित्री   प्रेम करी तिजवर   //५//

कन्या होती उपवर    धाडीले शोधण्या वर

राजा करी कदर    कन्येच्या इच्छेची    //६//

फिरुनी सर्व देशी    न मिळे कुणीही तीजशी

आली एका आश्रमापाशी    दृष्टीस पडला एक युवक   //७//

नजर त्यावरी पडूनी    स्तंभित राजकन्या होऊनी

रुप लागली न्याहाळूनी   सत्यवान युवकाचे   //८//

तेजोमय युवक पाहूनी    भान जाय हरपूनी

राजकन्येने वरिले मनोमनी   संकल्प लग्नाचा करी   //९//

राजपूत्र होता सत्यवान   पिता जाई राज्य गमावून

अंधत्व पित्याचे त्यास कारण    वनवासी झाले सारे    //१०//

सावित्री परतूनी घरीं     सर्व हकीकत कथन करी

आवड तिची सत्यवानापरी    मनीं त्यास वरिले   //११//

चर्चा करीत समयीं    नारदाचे आगमन होई

आनंदी भाव भरुनी येई    पुता पुत्रीचे   //१२//

वंदन करुनी देवर्षीला     कन्येचा संकल्प सांगितला

आशिर्वाद मागती लग्नाला    सावित्री सत्यवानाच्या   //१३//

नारद वदले खिन्न होऊनी   लग्न संकल्प द्यावा सोडूनी

विचार काढावा मनातूनी   सत्यवानाविषयी    //१४//

दुर्दैवी आहे सत्यवान    त्याची आयुष्यरेषा लहान

एक वर्षांत जाईल मिटून   जीवन त्याचे   //१५//

हे आहे विधी लिखीत    म्हणून होत निश्चीत

कोण करील बदल त्यांत   प्रभूविना   //१६//

ब्रह्मा लिखीत अटळ   झडप घालीतो काळ

न चुके कधी ही वेळ   हीच निसर्ग शक्ती   //१७/

थर्रर्र कापला नृपति    चकीत झाली सावित्री

ऐकून भयंकर भविष्याती     सत्यवानाच्या   //१८//

सावरोनी स्वतःशी   विचार करी मनासी

वदू लागली नारदासी   निश्चयीं स्वरानें   //१९//

प्रथम दर्शनी वरिले    मनोंमनीं पती मानिले

        सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले   कशी त्यागू मी त्याना   //२०//

काया वाचा मन   सत्यवाना अर्पून

पतिठायी त्याना वरुन   ह्रदयीं बसविले   //२१//

निवड करता पतीची   मनीं बसवुनी प्रतिमा त्याची

कल्पना न यावी दुजाची   हाच स्त्रीधर्म   //२२//

सप्त-पावली हा उपचार   होण्या सर्व जगजाहीर

   धार्मिक विधी एक प्रकार   राहीला असे   //२३//

स्त्रीचा असता हा धर्म   कां सुचविता अधर्म

           सांगा यातूनीच मार्ग    सावित्री विनवी नारदासी   //२४//

पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति    करोनी पति भक्ति

          ईश्वर मिळविण्याची युक्ती    सांगू लागले नारद   //२५//

पतिभक्ति करुन      तपसामर्थ्य येइल महान

तेच नेईल उध्वरुन     पावन होता प्रभू   //२६//

बघूनी सावित्रीचा निश्चय    नारद आनंदी होय

आशिर्वाद देऊनी जाय    नारायण नाम घेत   //२७//

दृढ निश्चयाची शक्ति   सावित्रीस चेतना देती

            माहित असून भविष्याती  उडी घेई जीवनयज्ञांत   //२८//

राजकन्या सावित्री    सत्यवानासंगे वनाती

       लग्न करोनी राहती   संसार करण्या   //२९//

पतीसी समजूनी देव   त्याचे ठायीं आदर भाव

मनीं बसवी त्यांचे नांव     अवरित   //३०//

नामात असते लय    लयांत एकाग्रता होय

             एकाग्र मनी ईश्वरी भाव    परमेश्वर सान्नीध्याचा   //३१//

पति हाच परमेश्वर   न पूजे दुजा ईश्वर

              सावित्री त्याचे चरणावर    अर्पण करी सेवा   //३२//

सेवेत असते तप   शक्तीचा तो दीप

                         प्रज्वलीत होईल आपोआप   तपः सामर्थ्य वाढता   //३३//

                      सोडूनी काळजी काळाची  पर्वा नव्हती वेळेची

                             अंतरीक इच्छा समर्पणाची    पतीच्या अल्प अयुष्यी   //३४//

                     वर्षा अखेरचा दिवस भयाण   घेत विश्रांति सत्यवान

                             वटवृक्षाखाली होता झोपून   सावित्री देत मांडीचा आसरा    //३५//

            आयुष्याची रेखा संपता   जीवन दोर जाई तुटतां

                   प्राणज्योत नेई यमदुता    त्याक्षणीं   //३६//

फांस घेऊन यमदूत    नेण्या सत्यवान प्राणज्योत

टाकले फांस गळ्यांत   सत्यवानाच्या   //३७//

सावित्रीची तपशक्ति    देई तिज दिव्य दृष्ठी

सोडून फास गळ्याभोवती    देई दूर फेकून    //३८//

यमदूत जाई घाबरुन     हतबल झाले ते बघून

           सावित्रीची शक्ति जाणून   रिक्त हस्तें गेले यमपूरीं   //३९//

यमराज मृत्युदंडाधिपती    संतापून ते येती

नेण्या प्राणज्योती     सत्यवानाची   //४०//

यमराज प्रभूचे दिक् पाळ   मृत्युरुपी ते महाकाळ

अपूर्व त्यांचे बळ    राज्यकरीं यमपूरी   ///४१//

नेवून मानव प्राणज्योत    कर्माप्रमाणे शिक्षा देत

         पाठवूनी नविन देही    परत जीवन गाडा चालवी   //४२//

रेड्यावर बैसूनी    यमराज आले धाऊनी

हातीं फांस घेऊनी   प्राण नेण्या सत्यवानाचे   //४३//

बसूनी सत्यवाना शेजारीं    पतीधर्माचे ध्यान धरीं

रक्षण कवच उत्पन्न करी   पती पत्नी भोवती   //४४//

तपाची दिव्य शक्ति   यमराजासी येण्या रोकती

फांस त्याचे न पोहोंचती   सत्यवाना पर्यंत   //४५//

बघूनी ते तेजोवलय    यमराज चकीत होय

      शोधूं लागला उपाय   सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत   //४६//

पतीकडून पाणी मागवून   सावित्रीस दूर सारुन

प्राण ज्योती घेई काढून    सत्यवानाची   //४७//

यमराज निघाला स्वर्गी    सावित्री त्याच्या मागे मार्गी

             पतिव्रता शक्ति तिचे अंगीं    चेतना देई मार्गक्रमण्यास   //४८//

मनीं तिच्या पतिभक्ति    बघून अपूर्व शक्ति

   यमराज प्रसन्न होती    सांगतले वर मागण्या   //४९//

श्वशुराचे अंधत्व गेले   राज्य तया परत मिळाले

वडीलांस पुत्र प्राप्त झाले   सावित्री मिळवी तीन वर   //५०//

न पावली समाधान    पाठलाग चालूं ठेवून

यमासी ठेवीत झुलवून    चर्चुनी विषय निराळे    //५१//

शेवटचा मी वर देईन    परी तू जावे परतून

मानव देहा स्वर्ग कठीण   कसे राहशील तूं तेथें ?  //५२//

जीवन आतां माझें व्यर्थ   न उरे जगण्या अर्थ

एकटेपणा ठरेल अनर्थ   माझ्या आयुष्यीं   //५३//

इच्छा माझी व्हावे माता    सानिध्य मुलाचे मिळतां

एकटेपणाचा भाव न राहता  उर्वरीत जीवनामध्यें    //५४//

पाठलाग घेण्या सोडूनी   तथास्तू म्हटले यमानी

मान्य तिची विनंती करुनी   वर देई तिला   //५५//

तथास्तू म्हणतां क्षणी   धरती गेली हादरुनी

          भयंकर विजा चमकोनी   निसर्ग उत्पात माजला   //५६//

मान्य केले मातृत्व   नसता जीवित पितृत्व

         शक्य कसे हे अस्तित्व   चुक उमगली यमराजा   //५७//

निसर्गाच्या नियमाला   तथास्तूने धक्का दिला

         नियतीचा डाव उलटला   सावित्रीच्या शक्तिनें   //५८//

जसा सुटावा बाण   तसा शब्द जाऊन

         यमराज पेचांत पडून    हारला सावित्रीपूढे   //५९//

सोडून देई प्राणज्योत  सत्यवान जीवदान मिळत

      अखंड सौभ्याग्यवती वरदान    मिळाले सावित्रीला   //६०//

वटवृक्षाखालती   पाऊनी सतीशक्ति

जीवदान मिळती    सत्यवाना   //६१//

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला   स्त्रीया पूजती वटवृक्षाला

अखंड मिळण्या सौभाग्याला    सावित्रीप्रमाणे   //६२//

पतिपत्नीतील प्रेमभाव    समजोनी मनाचा ठाव

                एकमेका आदरभाव     हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली   //६३//

// शुभंभवतु  //

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

समाधान

समाधान

 

दाही दिशांनी फिरत होतो

मनी बाळगुनी तळमळ ती

कसे मिळेल समाधान ते

विवंचना ही एकच होती

 

धन दौलत ही हातीं असतां

धुंडाळल्या त्या बाजार पेठा

न मिळे समाधीन कोठें

थकली पाऊले चालून वाटा

 

देखिले निसर्गरम्य शिखरे

आणिक कांहीं प्रार्थना स्थळे

शिलकीमध्यें दिसे निराशा

कारण त्याचे कांहीं न कळे

 

भावनेमधली विविध अंगे

येऊं लागली मनीं दाटूनी

उसंत मिळता थोडी तेव्हां

उतरत होती काव्य रुपानी

 

धुंदीमध्यें सदैव राहूनी

लिहीत गेलो सुचले जे जे

कसा काळ तो जावूं लागला

कोडे ह्याचे कधीं न उमजे

 

शोध आजवरी घेत होतो

सांपडले परि तेच समाधान

उत्स्फूर्तपणे जे करीत आलो

त्यातच दिसली बीजे महान

कविता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

अंतर्मनाची हांक

अंतर्मनाची हांक

नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं

अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं

कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी

रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी

आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके

पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे

कौतुक करतील कांही मंडळी, ज्याना ही आवडे

उणीव दिसता त्यांत कुणाला, बाजूला ती पडे

जाईन जेंव्हा जग सोडूनी, राम राम म्हणतां

जवळी ठेवा काव्य प्रत ही, देहा अग्नी देता

विलीन होता अनंतात, मी नेईन संगे शब्दांना

भूलोकीच्या आठवणी सांगेन, स्वर्गामधल्या देवांना

 

(कविता)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

क्रौंच पक्षाला मुजरा

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.

” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः

यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् ”

(जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)

क्रौंच पक्षाला मुजरा

कारुण्यामधूनी उगम पावला

आद्य काव्याचा झरा

वंदन करितो क्रौंच पक्षा

घे मानाचा मुजरा   १

गमविले नाहीं व्यर्थ प्राण ते

निषाधबाणा पोटीं

टिळा लावला काव्येश्वरीनें

मानानें तुझ्या ललाटीं   २

ह्रदयस्पर्शी जी घटना घडली

तडफड तव होतां

कंठ दाटूनी शब्द उमटले

पद्यरुप घेतां   ३

उगम पावतां काव्यगंगा ही

वाहू लागली भूलोकी

वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा,तुका

अशांचे आली मुखी   ४

काव्यप्रवाह हा सतत वाहे

कितीक जणांच्या शब्दातूनी

अंशरुपानें काव्येश्वरी ही

बरसे व्यक्त होऊनी   ५

(कविता)

 

                                                 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

कीटकाचे ब्रह्मांड

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी

रहात होते फळामध्यें

विश्व तयाचे उंबर फळ

जीवन घालवी आनंदे

ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती

उंबराच्या नसे पलिकडे

ज्यासी ते अथांग समजले

बघूनी त्या एका फळाकडे

माहित नव्हते त्या किटकाला

झाडावरची अगणीत फळे

सृष्टीतील असंख्य झाडे

कशी मग ती त्यास कळे

आपण देखील रहात असतो

अशाच एका फळांवरी

हीच फळे असंख्य असूनी

असंख्य झाडे विश्वावरी

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

डाग!

डाग!

 

कितीही देशी शीतल चांदणे

आनंदाचा ठरुनी मेरुमणी

काट्यापरि हा मध्येंच बोचतो

डाग तुझा लक्ष्य खेचूनी

ठाऊक नाहीं कधीं कुणाला

कसा लागला डाग उरीं

पडला असेल चुकून देखील

कुणी रंग उधळतां वेड्यापरि

शुभ्रपणाचा मानबिंदू हा

डागरहित जीवन त्याचे

केवळ एका डागापायीं

सत्य झांकाळते कायमचे

मिटून जातां डागही मिटतो

उरते मागें सत्य तेवढे

परि पुसण्यासाठी डाग एक तो

मिटणे उपाय जहाल केवढे

जोवरि जीवन चंद्रा तुझे

डाग दिसेल माथ्यावरचा

दुग्धामृताच्या घटांमधला

असेल थेंब तो विरजणाचा

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

तुझ्या भोवती नाचती गौळणी

भान त्यातर गेल्या हरपूनी

थकूनी गेल्या नाच नाचुनी

विसरुनी गेल्या घरदारानां //१//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

रमले सारे गोकूळवासी

पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

बागडती सारें तव सहवासी

करमत नाही तुजविण त्यांना //२//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

संसार सोडला राधेने

भारुनी गेली तव प्रेमानें

ध्यास घेतला तुझाच तिनें

तुजविण नव्हती दूजी भावना //३//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

मीरेचे तर प्रेम निराळे

विषालाही प्राशन केले

तुजसाठी सर्वस्व अर्पिले

कसा तारशी तुं भक्तांना //४//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

श्री हनुमान जन्मकथा

श्री हनुमान जन्मकथा

वंदन तुज मारुतीराया    तुझा आशीर्वाद मिळाया

न कळे कुणास तुझी माया      भक्ताविना   १

रुद्राचे तू रुप असता    शक्तीची तू देवता

अचाट कामे क्षणांत    ह्या पृथ्वीवरी   २

शक्ती बुद्धी नि सेवा    ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा

भक्तीभाव मनीं यावा    हीच माझी इच्छा   ३

शक्तीचे तूं दैवत    बुद्धीदाता तूं होत

शक्ती नि बुद्धी एकांत   मिळे तुझ्या आशिर्वादे   ४

हनुमंताची जन्मकथा    आनंद होई सांगता

चितीं समाधान देता    तुमच्या ठायीं   ५

अंजनी एक वानरी    भक्ती तिची शिवावरी

रात्रंदिनी भजन करी    सदाशिवाचे   ६

प्रभू भक्तीचा भूकेला   पावन होई भक्ताला

लक्ष देई शंकेला    भक्तांच्या   ७

भक्तीचा महिमा थोर    सर्वांसी उघडे द्वार

असेल नर अथवा वानर    कुणासही पावत असे   ८

अंजनीची पाहून भक्ति    शिव प्रसन्न होती

आशिर्वाद तिजला देती    विश्वनाथे   ९

अंजनी होती वानरी    इच्छा ती करी

तुम्ही यावे उदरीं    लाभावा प्रभू सहवास   १०

शिवाचे मोठेपण    वाटते भोळेपण

परी भक्तास जाई शरण   हिच शक्ती भक्तिची   ११

तपांत असते शक्ती   तेथे पाहीजे अंतरीक भक्ति

सामान्यास जाणिव न येती    खऱ्या भक्तीची   १२

भक्तीची शक्ती    प्रभूला खेचती

हीच त्याची महती    समजोन घ्यावी   १३

प्रल्हाद नि ध्रुव बालक    वाकवितीं विश्वचालक

तैसे अंजनी वानरी एक    मिळवी तपशक्ती   १४

जेव्हां भक्त घाली सांकडे    उपाय नसतो प्रभुकडे

कसे टिकेल भक्तापूढें    प्रत्यक्ष परमेश्वर   १५

दुजा मार्ग नसे    इच्छा भक्ताची असे

संतुष्टकरावे कसे    काळजी ह्याची प्रभुला   १६

हनुमंत म्हणून   तुझ्या उदरीं येईन

राम सेवा करीन    शिव बोले   १७

अयोध्येचा राजा दशरथ   राहता विना अपत्य

दुःख त्यासी होत    संततीसाठी   १८

उपदेश वशिष्ठ ऋषींचा    पुत्र कामेष्ठी यक्ज्ञाचा

प्रसाद मिळेल पुत्राचा    यज्ञदेवते कडून   १९

यज्ञ केला महान    जमवून ऋषीगण

द्रव्याचे केले हवन    यज्ञामध्ये   २०

पाहून दशरथ भक्ति    यज्ञदेवता संतुष्टती

पवित्र पायस देती    दशरथासी   २१

प्रसादाचे भाग करावे   राण्यास वाटून द्यावे

पुत्रवती व्हावे   यज्ञदेवता आशिर्वादली   २२

समभाग करीत असतां   अघटीत घटना घडता

आकाशातूनी घार येता   एक भाग उचलून नेई   २३

धरुन एका भाग    घार उडाली आकाशी

झेप घेता नभाशीं   भाग निसटला चोंचीतूनी   २४

अंजीनी वानरी   बसली पर्वत शिखरीं

प्रभूचे भजन करी   दोन्ही हात पसरोनी   २५

बघत होती वायुदेवता   प्रसन्न अंजनीवर होता

प्रसाद तिच्या पडण्या हाता    मदत करी   २६

प्रसादाचा भाग पडला   अंजनीचे हाती मिळाला

आनंदे स्विकारी त्याला   प्रभूचा प्रसाद समजोनी   २७

वायुपुत्र संबोधती   वायुची चपळता मिळती

मुर्तिमंत असे ती शक्ति    पवन पुत्र हनुमान   २८

चैत्रशुद्ध पोर्णिमेला   हनुमंताचा जन्म झाला

शिव ह्या जगती अवतरला   अंजनीचे उदरीं   २९

बजरंगबली मारुती   सगुणरुप हीच शक्ती

ह्या विश्वात अवतरती   अंजनी पुत्र बनोनी   ३०

सूर्वोदयाचे समयीं   मारुतीचा जन्म होई

बाळ सुर्याकडे पाही    आश्चर्याने   ३१

उगवत्या सुर्याची लाली   फळा प्रमाणी भासली

भूक हनुमानास लागली   झेप घेई सुर्याकडे    ३२

मारुती म्हणजे शक्ति   शिवाचे रुप असती

झलक त्याची दिसती   जन्माताक्षणीं   ३३

असून लहान मुर्ती   प्रचंड त्याची शक्ति

सुर्याकडे झेपावती   मिलण्या त्यासी   ३४

इंद्र गेला घाबरुनी   हनुमानाची झेप पाहूनी

संकटात सुर्यासी बघूनी   काळजी पडली विश्वाची   ३५

इंद्राची सत्ता देवांवरी   राज्य त्याचे विश्वावरी

देवांची तो काळजी करी    विश्व चालणेसाठी   ३६

राहू केतू शनी   यम वरुण अग्नि

टाकीले सर्वासी   हरवूनी हनुमंतानी   ३७

बघूनी हनुमंताची झेप   इंद्रस होई कोप

रागाने आला संताप   वज्र टाकिले मारुतीवर   ३८

इंद्रवज्र कठीण    शक्ति त्याची महान

नष्ट होई तो लागून    इंद्र फेकता ज्याचेवरी   ३९

दोन शक्तींची टक्कर    मात करी एकमेकांवर

वज्रघात होतां हनूवटीवर   मुच्छित झाला मारुती.   ४०

मारुतीस मूर्च्छित बघोनी   वायु आला धाऊनी

प्राण शक्ति त्यास देऊनी    सावध केले   ४१

इंद्रास प्रश्न पडला    बघून अपूर्व बालशक्तीला

काय असावी प्रभू लीला    कळेना कुणा   ४२

ब्रह्मा प्रकट होऊनी    सर्व देवासंगे जमूनी

सांगू लागले समजावूनी    हनुमंताविषयी   ४३

हनुमंत आहे रुप प्रभूचे  शिवाचे शिवशक्तीचे

करील कार्य सेवेचे    श्रीरामाच्या   ४४

देवांनी आशिर्वाद दिले   सर्वामध्ये श्रेष्ठ ठरविले

शक्ति बुद्धीची देवता संबोधीले    मारुतीस   ४५

प्रभूरामाची करावी सेवा   मनामध्यें भक्तीचा ठेवा

प्रभूचरणी लीन व्हावा   हेच दाखविले जगांते   ४६

प्रत्येक गांवाच्या वेशीवर   मारुतीचे असते मंदीर

आनंदी गांव असणार    हनुमंताचे कृपे   ४७

पूजन करावे मारुतीचे   भजन स्तोत्र म्हणूनी त्याचे

वाहूनी पुष्प पत्र रुईचे   तेल अर्पण करावे   ४८

प्रत्येक शनिवारीं   जावे प्रभूचे मंदीरी

जमल्यास रोज करी   दर्शन मारुतीचे   ४९

जेवढी कराल प्रभूभक्ती   मिळेल बुद्धी नि शक्ती

यश तुम्हां प्राप्त होती    मारुतीच्या आशिर्वादें   ५०

// शुभं भवतु  //

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०