Daily Archives: सप्टेंबर 11, 2016

आनंदी किटक.

आनंदी किटक.

सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.
वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातास देवपूजेसाठी राखून ठेवला होता. केवळ समाधान व मनःशांती मिळण्यासाठी. हा एक मनाच्या विश्वासाचा व श्रद्धेचा प्रश्न. मनाची एक धारणा झाली होती की कोणती तरी शक्ती, उर्जा शक्ती असते, जीच्यामुळे जगातल्या सर्व व्यवहारांचे नियमन होत असते. निसर्ग म्हणा वा ईश्वर. नांव, वर्णन हे मला सदैव गौण वाटले. मात्र परिणाम दृष्य वा अदृष्य स्वरुपांत जे सतत होतात, ते तर मान्य करावयांसच हवे. त्या शक्तीमान अस्तित्वाला अभिवादन करणे, सन्मानित करणे मनास समाधान देणारेच असेल. ती शक्तीस्वरुप म्हणून जाणने जास्त महत्वाचे. मात्र तीच्या आकार, रंग रुप इत्यादी मार्गाने गेल्यास मन सतत शासंक व अशांत असणार.
संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराजानी म्हटल्याप्रमाणे —
कांसेची केली अंबा परी कांसे नव्हे जगदंबा
अंबेची पूजा अंबे घेणे कांसे राही कासेपणे. //
पाषाणाचा केला विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू
विष्णूची पूजा विष्णूसी अर्पे पाषाण राहे पाषाण रुपे //
केला मातीचा पशुपती परी मातीची काय महती
शिवपूजा शिवासी पावे माती मातीत समावे //

देवघरांत डोकावले. सर्व देवाना नमस्कार केला. देवघरांतील वातावरण बघून मन त्या क्षणी खिन्न झाले. सर्वत्र जाळे, जळमटी, दिसत होते. किडे मुंग्या झुरुळे, कोळी यांच्या हलचाली सर्वत्र दिसत होत्या. दोन आठवडे तेथे झाड झुड नव्हती. वरदळ नव्हती. स्वच्छतेची कोणतीच मोहीम नव्हती. छोट्य़ा छोट्या त्या प्राण्यासाठी एक रान मोकळे केलेले होते. अनेकांनी जसे जमेल व जसे निसर्गाने शिकवले असेल त्याप्रमाणे आपापली घरटी बांधलेली होती. स्वैर आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
माझ्या दृष्टीने एक अस्वच्छ वातावरण. सर्वत्र कचरा घुळ, घाण यांचेच साम्राज्य. एका पवित्र अशा देवघरांत ईश्वराचे जेथे सान्निध्य असल्याची भावना, श्रद्धा तेथे अस्वच्छ परिसर ह्या कल्पनेने मन निराश झाले. स्नान करुन शुचिर्भूत झालो. व देवघरांत गेलो. हाती केरसुनी घेऊन सर्व स्वच्छ केले. जाळी जळमटी काढून टाकली. ओल्या फडक्याने पुसून घेतले. नंतर नेहमीच्या पद्धतीने देवांची पूजा केली. उदबत्ती दिवा लावला. नेहमीप्रमाणे पूजा झाल्यानंतर दाराशी पाटावर बसून चिंतन करणे, मंत्र श्लोक म्हणने ही सवय. एकाग्र चित्त करण्याच्या प्रयत्न्यात होतो. पण मन शांत होत नव्हते. देव घरांत सर्वत्र बघत होतो.

अचानक कांही कोळी, एक दोन झुरुळ कोठून तरी तेथे आल्याचे दिसले. कदाचित् त्यांची घरे जी स्वच्छता मोहीमेत काढून टाकली गेली, त्याचा आढावा ती घेत असावी. त्यांच्या भावना, त्यांचे विचार कळण्यास मार्ग नव्हता. मात्र त्यांच्या हालचालीवरुन त्यांच्या खिन्न तगमगीचा अंदाज येत होता.
माझ्या मनासाठी ते देवघर, एक मानवनिर्मित थोडीशी वेगळी व स्वतंत्र जागा. तेथे पुजेशिवाय शांत बसून ध्यान घारणा करणे, भजन करणे, नामस्मरण करणे, पाठ केलेली वा वाचलेले मंत्रविधी करणे, हे प्रमुख चालायचे. सत् चित् आनंद मिळविण्याचा प्रयत्न असायचा. समाधान आणि शांतता हे मनाचे गुणधर्म. त्यातील आनंद हेच ईश्वरी प्रतीक असते. आनंद हा लाटेत वा लहरीमध्ये वातावरणांत उत्पन्न होतो. त्या जागेत शिरताच त्याची अनुभूती येते. तो सर्वासाठी अर्थात प्रत्येक जीवांसाठी तसाच असतो. आनंदी वातावरणांत शिरतांच त्या आनंदी लाटा तुम्हास आनंदी करतातच. कारण आनंद चैतन्यस्वरुप असतो. मग तो आनंद जसा मला मिळत होता, तसाच त्या किटकांना, क्रिमीना देखील निश्चीत मिळत असावा. म्हणूनच त्या आनंदमय वातावरणांत ते सर्व तेथेच आपापली घरे, संसार त्यांच्या पद्धतीने साजरे करु इच्छीत असावे. कदाचित् त्यांच्या आनंदाला मी माझ्या स्वार्थबुद्धीने अडकाठी आणत होतो. त्याचमुळे मी समाधानाला, शांततेला वंच्छीत राहीलो असेल. मज जवळ त्याचे उत्तर नव्हते. डोळे मिटून मी त्या वातावरणामधील मिळणारय़ा आनंदाप्रमाणेंच मनास शांत करण्याचा प्रयत्न करीत बसलो.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com