आनंद लुटणारे मन !

आनंद लुटणारे मन !

 सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर  टिप्पणी करीत होत्या.  मान डोलावाने,  टाळ्या  वाजवणे, वाहवा ! म्हणत आपला आनंद व्यक्त करणे, चालू होते. “ काय गाण्याची चाल, किती सुंदर वाद्यसंगती जमली आहे, काय चांगली तान मारली आहे ह्यातील बासरी तर किती सुमधुर वाजवली, तबल्याचा ठेका कसा धरला आहे सतारीचे बोल किती मधुर जमलेत, पेटीवादन तर अप्रतिम साधले, शंकर जयकिशन याचं संगीत खूपच मनाला मोहून टाकते, नौशादअलीचे हे गाणे काय सुरेख  जमले —– एक नाही अनेक हालचालीच्या  पैलू  मधून त्या बाई आपले संगीतातले,  गाण्यामधले आत्मिक समाधान अभिव्यक्त करीत होत्या.  न जाणो मी मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे  निराशलो होतो.  कारण त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माझे लक्ष विचलीत होत होते. संगीतातील मला मिळणाऱ्या आनंदात बाधा निर्माण होत होती. तरीही माझ्या मनाला आवर घालून सारे सहन करीत होतो.

कार्यक्रम संपला. सर्व श्रोते उठून जावू लागले. मी मात्र त्या बाईंच्या उत्साहाणे बेचैन झालो होतो.   शेवटच्या क्षणी  वैचारिक बांध फुटला. मी तिला विचारले. “ तुम्हाला संगीत कार्यक्रम खूपच आवडलेला दिसतो. परंतु  राग येणार नसेल तर सांगू का? तुमच्या सततच्या टिप्पणीमुळे  व हालचालीमुळे शेजारच्याना त्रास होतो का हे ध्यानात घेत चला. “   ती मागे वळून किंचित हसली. आभारी महाशय,  मी यापुढे काळजी घेईन. मी त्याक्षणी विसरले होते की  आपणामुळे  कुणाला त्रास होत असेल. “   ती शांत होती. मी उठून जाऊ लागलो. दाराजवळ गेल्यावर मी सहज मागे बघितले. मला जे दृश्य दिसले,  त्याने मला धक्काच बसला. तिच्याजवळ बसलेले दोघेजण तिला हाथ देवून उठवीत होते. त्यांच्या  खांद्याचा  आधार घेवून ती पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दोन्ही पाय अपंग झाले असावे.  माझ्या डोळ्यात  एकदम अश्रू आले. माझ्या विचारांची मलाच लाज वाटली. तिचे शरीर अपंग होते, पण मन किती तजेले, उत्स्ताही  होते. जीवनात निर्माण झालेली जबदस्त उणीव ते भरून काढीत होते. मनाची उभारी, आनंदाची फवारणी करून, कोमेजून जाण्याऱ्या शरीर संपदेला टवटवीत ठेवण्याचा    प्रयत्न  करीत होती.  फुलवीत होती. ह्या जगात जगायचे कसे? ह्याचा एक आदर्शवत संदेश देत होती.   

 

डॉ. भगवान नागापूरकर

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s