प्रेम- अहंकाराचे अंकुरण

जीवनाच्या रगाड्यातून-

प्रेम- अहंकाराचे अंकुरण

 

संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.

अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्या हेडवायरला नेमधरुन मारीत होते. कुणाचा अचूक नेम लागतो, ह्याची त्यांची चढावोढ लागलेली दिसून येत होती. बहूतेक नेम चुकत होते. परंतु रेल्वेरुळामध्ये लहान लहान खडीचे बरेच दगड होते. ते त्या दगडांचा सर्रास वापर करुन त्या हेडवायरला लक्ष्य करीत होते. त्याच्या दिशेने दगड फेकीत होता. सारा खेळ भयानक होता. तो रेल्वेरुळ मार्गाला घातक देखिल होता. दूर अंतराहून मी हे सारे बघत होतो. मी बेचैन झालो. त्या मुलांच्या खोडकर खेळण्यावर अंकूश ठेवण्यासाठी जवळपास कुणीही दिसून येत नव्हते. शेवटी आपणच त्या विचित्र खेळाला टोकावे, मुलांना समज द्यावी ह्या उद्देशाने मी उठलो.

मुले थोड्याशा अंतरावर होती. मी दुरुनच ओरडलो. “ये मुलानो, काय चालले आहे ?, रेल्वे मार्गाचे व हेडवायरचे नुकसान करु नका. जा धरी जा आता. ”    त्यांचे लक्ष माझ्याकडे जाताच त्यानी आपला खेळ बंद केला. मी त्याना हाताने जा म्हणून खुणावत होतो. अचानक त्याच्यातील एकाने पुढे येवून हातातील दगड माझ्याच दिशेने भिरकावला. मी ओरडून त्यांच्यावर रागावलो. परंतु आश्चर्य म्हणजे ती मुले निघून जाण्याऐवजी, सर्वांनीच हाती दगड घेवून ते माझ्याच दिशेने फेकूं लागले. एक अनपेक्षित व भयावह परिस्थिती निर्माण झाली. शेवटी मला माझे वय आणि शक्तिच्या मर्यादा जाणून, मीच तेथून माझा पाय काढता घेतला.

लहान शाळकरी मुले. खेळकर वय. परंतु त्यांच्यामधली विध्वंसक वृत्ती बघुन मी चक्रावून गेलो. असे म्हणतात की प्रेम आणि अहंकार ह्या फक्त दोन स्वभावगुणधर्माचे रोपण हे जन्मापासूनच निसर्ग करीत असतो. इतर गुणधर्म त्यांच्या पासूनच उत्पन्न होत असतात. चांगला स्वभाव, चांगल्या वृत्ती, सद्सदविवेकबुद्धी अशा गुणांची वाढ ह्या प्रेमाच्या बिजामधून होत असते. त्याचप्रमाणे राग लोभ मोह इत्यादी षडरिपूं वा विद्धवंसक वृत्तिंची वाढ ही अहंकार ह्या मुळ स्वभावापासूनच होत जाते. जीवनचक्रामध्ये अत्यंत प्रभावी, परंतु गरजेचे असलेले हे दोन स्वभावगुणधर्म प्रेम व अहंकार होत. ह्या जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात. खेळातल्या चितपट ह्या संकलपणेप्रमाणे जीवनाचा मार्ग ते आखत असतात. कधी अहंकाराचा तर कधी प्रेमाचा विजय होत असताना आपण बघतो. निसर्गाचे एक वैशिट्य म्हणजे तो प्रत्येकाच्या जीवनाच्या अंतीम टप्यावर, प्रेमाचाच विजय नोंदवितो. आजची ही खट्याळ वाटणारी मुलेही निश्चीतच स्वभावानी बदलतील ह्याची मला खात्री वाटते.

 

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s