Daily Archives: मार्च 31, 2014

एक अफलातून व्यासंग

एक अफलातून व्यासंग 

एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते.

” मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. “   त्यानी कुंडी व कार्ड ठेवले.  घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले.

मी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो. ते कार्ड मी वाचले.

”तुळशीच्या झाडाचे घरांमधील अस्तित्व ही कौटुंबिक संस्कार क्षमता निर्माण करणारी संकल्पना आहे. तीला ईश्र्वरी- नैसर्गिक देण समजा. तीच्या वाढीमधून निर्माण होणाऱ्या अदृष्य लाटा,  ह्या सर्व घराला कुटूंबवत्सलता  आणण्यास मदत करतील. मुलांच्या बालमनावर संस्कार करतील. तरुणाना चैतन्य शक्ती प्रदान करतील. आणि ज्येष्ठाना मनाची शांतता मिळवण्यास सदैव मार्गदर्शन करतील. घराचे, कुटुंबाचे व सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील  ही तुळशीदेवी व ईश्र्वराचे चरणी प्रार्थना.”

त्यावर त्या सद् गृहस्थाचे नांव पत्ता होता.

मी भारावून गेलो. दैनंदिनीच्या धावपळीत आणि कार्यबाहुल्यांत मग्न राहून, सारे लक्ष्य व्यवहारी जीवनांत गुंतून राहीलेले जाणवले. जीवनाचे सत्य, अंतिम ध्येय हे कशासाठी करावयाचे याचा विसर पडत असल्याचे त्या क्षणाला वाटले. ह्रदय भरुन आले.

मी त्या अनामिक परंतु महान वाटणाऱ्या  व्यक्तिशी संपर्क साधला. त्यांच्या घरी मी जे बघीतले व एकले ते सारे आश्र्चर्यचकीतच वाटले. त्यानी नुकतीच वयांची सत्तरी पूर्ण केली होती. आपल्या शारीरिक व मानसिक प्रकृतीची  ते फार काळजी घेत असत. माणसांत जेवढी क्षमता असेल ती सारी शरीर स्वास्थ जपण्यांत खर्च करावी, त्याकडे लक्ष्य द्यावे ही त्यांची संकल्पना असे. धडपडीचे जीवन जगणे हा काळ संपलेला आहे. जे जमले, जसे जमले, ते हस्तगत केले. आतां त्याच मिळालेल्या जीवन मुल्यांत रममान असावे, ही त्यांची धारणा.

आपल्या शारीरिक आरोग्यासाठी त्यानी एक व्यासंग स्वतःला लाऊन घेतला होता. त्यांत ते तन-मनानी कार्यारत असत. ज्या घरांत ते रहात होते, ते जुन्या पद्धतीचे होते. मागील दारी अंगण होते. थोडीशी बागेसाठी मोकळी जागा होती. दररोज ते बराच वेळ तेथे व्यस्त असत. जागा साफसुफ करुन, मातीमध्ये खत घालून, बरीच आळी केलेली होती. त्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या मंजिऱ्या अर्थात बिया टाकून त्याचे व्यवस्थीत रोपण केलेले होते. लागेल तेवढे पाणी दिले जायी. योग्य ती मशागत होई. थोड्याच दिवसांत तुळशीची टवटवित रोपे आलेली दिसत. त्यानी लहान लहान प्लँस्टीकच्या कुंड्या आणलेल्या होत्या. त्यामध्ये ते तुळशींचे रोपण करीत असत. ह्या तुळशीच्या कुंड्या आणि भेटकार्ड ते केवळ सदिच्छा समजून निरनीराळ्या घरी नेवून देत. पैशांची केव्हांच अपेक्षा केली नाही. त्यांची ही सप्रेम-भेट लोकांनी मान्य करावी,  ह्यातच ते समाधान मानीत होते. अर्थात ह्या संस्कारीक व भावनिक भेटी कशा विनामुल्य राहतील. लोक देखील परत भेट ( Return Gift ) समजून भरभरुन पैसे देत असत. त्यांच्या अफलातून अशा योजनेसाठीची ती गंगाजळीच नव्हे काय ? .

मी देखील त्यांच्या घरांतील तुळशीवृंदावनाची पुजा करीत, दक्षिणा ठेवून समाधानाने घरी आलो.

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com