।। भगवान श्री गौतम बुद्घ ।।

जीवनाच्या रगाड्यातून-

।।  भगवान श्री गौतम बुद्घ  ।।

 माझे नमन बौद्धाला   सत्य अहिंसेच्या देवाला

कोहिनुर हिरा चमकला   ह्या विश्वामध्यें   ।।१।।

गौतमाचे जीवन   बौद्धाचे तत्वज्ञान

दोन्ही असती महान   उद्धरुनी नेई जगातें   ।।२।।

दाखवोनी जीवनाचे द्वार   सांगोनी आयुष्याचे सार

भटकलेल्या व्यक्तींचा आधार   बौद्ध  होई   ।।३।।

बौद्धाचे तत्वज्ञान   असे ते महान

नेई उद्धरुन   सर्व जनांना   ।।४।।

उद्धरुन जाती   जे बौद्धास जाणती

शिकवणीची महती   बौद्धाने सांगितलेल्या   ।।५।।

प्रथम सांगतो जीवन   नंतर ऐकवी शिकवण

मात्र करावे आचरण    हीच सार्थकता तुमची   ।।६।।

गौतमाचा इतिहास काव्यमय   कथा त्याची भावमय

ऐकतां मन भरुन जाय    कठीण आहे समजण्या   ।।७।।

ज्याच्यासाठीं  झगडे व्यक्ति   तीच जन्मतां त्याचे हातीं

धन सत्ता नि संपत्ति   त्याग केला सर्वस्वाचा   ।।८।।

सामान्य माणूस    सर्वस्व समजे देहास

चिंता त्याची ऐहिक सुखास   रात्रंदिनीं   ।।९।।

धनाच्या कुणी पाठीं   झगडतो कुणी सत्तेसाठीं

घालवी जीवन सुखापोटी   ऐश्वर्यास ध्येय समजोनी   ।।१०।।

गौतम मोठे नशिबवान   राजघराणीं जन्म घेऊन

लोळण घेती सत्ता नि धन   गौतमाचे जवळी   ।।११।।

कपिलवस्तु नगरी   शुद्धोधन राजा राज्य करी

प्रेम होते प्रजावरी   पुत्राप्रमाणें   ।।१२।।

केली प्रभुवर भक्ति   त्याचे आशिर्वाद मिळती

प्राप्त झाली संतती   राजा शुद्धोधनास   ।।१३।।

बाळाचे तेज दिव्य   जन्मता भासले भव्य

अपुर्व चमके भाव   त्याचे मुखावरी   ।।१४।।

कुणी संबोधती भगवान   अवतार विष्णूचा म्हणून

परी निसर्गाचे ते एक देणं   ह्यात शंका नाहीं   ।।१५।।

मानव रुप घेती   ईश्वरी शक्ती असती

ऐसे क्वचित होती   ह्या संसारी   ।।१६।।

साधू संत जमती   कांही भविष्य जाणती

आशिर्वाद बाळा देती   सर्व मिळूनी   ।।१७।।

 हस्त रेखा बघूनी   बाळा जन्मकुंडली जागोनी

विस्मित होऊनी   जाई ज्योतिषी   ।।१८।।

बाळाचे भविष्य निराळे   सामान्यांस न कळे

पंचभूताचे जाळे   असती त्याचे भवती   ।।१९।।

बाळासी मिळे अप्रतीम शक्ति   परंतु राजा न बनती

संसाराची येऊन विरक्ति   रमुन जाईल वनांत   ।।२०।।

न होई राजा नगरीचा   राजा बनेल निसर्गाचा

महाराजा तो विश्वाचा   अंतरात्म्यावर राज्य करी   ।।२१।।

जाणवेस निसर्ग सृष्टी   बाळाची असेल व्यापक द्दष्टी

न व्हावे राजा कष्टी   संकुचित् भाव सोडावा   ।।२२।।

सोडूनी स्वतःचा संसार   शिरी घेईल विश्वभार

विश्वाचा करील उद्धार   तोच एकला   ।।२३।।

राजास न पटे हे तत्व   न आवडे त्यास हे कवित्व

बाळ त्याचे जीवनसत्व   मायेपोटीं खिन्न झाला   ।।२४।।

नांव सिद्धार्थ ठेवले   उपाय मनीं योजिले

बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी   ।।२५।।

राजाचा भव्य महाल   ऐश्वर्याची रेलचेल

सर्वत्र सुख दिसेल   ह्याची घेई काळजी   ।।२६।।

दुःखाची छटा नको   विरक्तीचा भाव नको

एकांतवास नको   ह्याची चिंता राजाला   ।।२७।।

सुंदर बागेमधील   कोमेजलेले फुल

न पाही सिद्धार्थ मुल   ही सुचना सर्वांना   ।।२८।।

सिद्धार्थ वाढला विलासांत   जीवन ऐश्वर्य कंठीत

लग्न होऊनी पिता बनत   संसारांत रमला   ।।२९।।

उत्सव राजधानीतील   बघण्या सोहळा नगरीतील

प्रथम ठेवले पाऊल    सिद्धार्थाने प्रासादाबाहेर  ।।३०।।

आयुष्याचा तो क्षण   टाकी जीवन पलटून

विधी लिखीत अटळ असोन   कुणी न बदले त्यासी   ।।३१।।

उत्सवातील जनसागरांत   पाही एक म्हातारा नि प्रेत

दुःख दिसे जीवनांत   प्रथमच सिद्धार्थाला   ।।३२।।

माहीत नव्हते त्यासी   दुःखे असती जीवनासी

जर्जर करुनी देहासी   मृत्यु येई शेवटीं   ।।३३।।

जन्म स्थिति व लय   जीवनाचे चक्र होय

निसर्ग चालत राहाय   प्रथमची जाणले सिद्धार्थानें   ।।३४।।

सरळ मार्गी जीवनांत   विस्फोट होऊनी जात

लुप्त असलेल्या ज्ञानांत   चेतना जागृत झाली   ।।३५।।

रात्रीच्या काळोखांत   विज चमकावी आकाशांत

उजेड होई वातावरणांत    एका क्षणामध्यें   ।।३६।।

तशी ती दुःखद घटना  पेटवी सिद्धार्थाची चेतना

लहरी उठती मना   जीवनाबद्दलच्या   ।।३७।।

नविन प्रकाश पडला मनीं   राजपुत्र गेला भांबावूनी

सत्य शोधण्याची आंस ध्यानी  संकल्प त्याने केला   ।।३८।।

उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती   ऐहिक सुख त्यागती

सोडूनी राज्य आणि संपत्ति   जाई निघोनी वनांत   ।।३९।।

त्याग केला पत्नीचा   सोडला मोह बाळाचा

मार्ग पत्कारी एकांताचा   जाई निघूनी अज्ञातस्थळी   ।।४०।।

हे सारे अघटित   आपण म्हणूं दैवलिखीत

परंतु हे अपूर्व होत   सामान्याचे काम नव्हे   ।।४१।।

सर्व साधारण धडपडतो   ज्याचे साठी जगतो

तेचि सिद्धार्थ लाथाडतो  ह्यासी म्हणावे असामान्य   ।।४२।।

म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष   परमेश्वरी अंश

दाखवोनी खरे आयुष्य   सुखाचा मार्ग दिला   ।।४३।।

सर्वची सोडोनी   गेला तो वनीं

एकची विचार मनी   जीवनांचे सत्य शोधणे   ।।४४।।

निसर्ग रम्य स्थळी   बौधीवृक्षाखालीं

तपः साधना केली   सिद्धार्थाने   ।।४५।।

एकाग्र करुनी मन   लावले ध्यान

केले चिंतन   अंतरात्म्याचे   ।।४६।।

अंन्तर्मुख झाला   बाह्य जगा विसरला

सत्यास शोधूं लागला   सिद्धार्थ   ।।४७।।

अंतर्मनातील सुप्त शक्ति   बिंदूप्रमाणें असती

रुप प्रचंड घेती   जागृत झाल्याने   ।।४८।।

शक्ति असे आत्मबिंदु   त्याचा होई परमात्मा सिंधु

भाव बने आनंदु   चेतना उद्दीप्त होता   ।।४९।।

राग लोभ अहंकार   मद मत्सर विकार

षडरिपूंचे रुप भयंकर   आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे   ।।५०।।

संसारातील मायाजाळ   त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ

सुप्त राही ते कमळ   चिखलाच्या वेष्ठनामुळें   ।।५१।।

फुटावा लागतो अंकुर   यावे लागते पाण्यावर

तेंव्हा कमळ दिसणार   आनंदमय   ।।५२।।

नारळा बाहेरील करवंटी   आंत मधुर खोबरेवाटी

तैसी मोहमायाची जळमटी  व्यापूनी टाकी आत्मबिंदू   ।।५३।।

 मोहाचे असतां वेष्ठन   आत्म्यासी येई असुद्धपण

मोह आणि आत्मज्ञान   दोन्ही नसती एके ठिकाणी   ।।५४।.

अग्नि आणि पाणी   जाई विरुद्ध दिशेनी

तत्वे वेगवेगळी असोनी    निर्गाची   ।।५५।।

तैसेची संसारातूनी   मायाजाळ दूर करुनी

आत्मतत्वास जाणूनी   आत्मशुद्धी करावी   ।।५६।।

सिद्धार्थाचे ध्यान   काढूनी मायाजाळाचे वेष्ठन

आत्मबिंदूसी होई विलीन   ज्ञानाग्नी पेटला चित्ती   ।।५७।।

बौद्धी वृक्षाखालीं   ज्ञनगंगा मिळाली

अंतर्चेतना जागृत झाली   सिद्धार्थाची   ।।५८।।

गौतमबुद्ध संबोधले    महात्मापद मिळविले

महान तत्व शिकविले   बौद्धधर्म स्थापुनी   ।।५९।।

बौद्धाचा पाया महान   सत्य अहिंसा हे तत्वज्ञान

जाणण्याते करावे ध्यान   सार्थक करण्या जीवनाचे   ।।६०।।

                                                       ।। शुभं भवतु  ।।

 डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२७दोन कान दोन डोळे असल्याने जास्त ऐकावे आणि बघावे

जीभ मात्र एकच म्हणून मोजकेच बोलावे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s