Daily Archives: मे 20, 2013

।। श्री नृसिंह अवतारकथा ।।

जीवनाच्या रगाड्यातून-

दिनांक २३-५-२०१३ रोजी च्या श्री नृसिंह जयंती प्रित्यर्थ

।। श्री नृसिंह अवतारकथा  ।।

( भक्त प्रल्हाद )

प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान

अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।।

बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी

त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।।

प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन

त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।।

अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति

संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।।

बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणार

परि प्रभूसीच वाकवणार  प्रल्हाद बालक    ।।५।।

नारद ऋषीं एके दिनीं  हिरण्यकश्यपूचे राजधानीं

पाद्यपुजा स्वीकारुनी  गेले प्रसन्न होऊनी    ।।६।।

शिवाची करावी भक्ति  मिळवावी तप शक्ति

सामर्थ्यवान ह्या जगतीं  होऊनी करावे राज्य   ।।७।।

नारद राणीस उपदेशीती  जो नारायणाचे नाम घेती

उद्धार ह्या जगती  त्याचा होत असे   ।।८।।

गर्भवती तूं राणी   भक्तिभाव ठेवतां मनीं

ईश्वर संस्कार पडूनी  बनेल बालक महान   ।।९।।

राजा उपदेश ऐकूनी  गेला तपश्चर्येस वनीं

राणी राजधानी  नारायणाचे नामस्मरण करी   ।।१०।।

करुनी तप महान  शिवासी केले प्रसन्न

वरदान घेई मागून  वाढवी आपली शक्ति   ।।११।।

असे मागीं वरदान  जेणे टळावे मरण

परि प्रभू लिला महान  कसे टाळी ब्रह्मालिखीत   ।।१२।।

पशू अथवा नर   राजगृहीं वा बाहेरी

कुणी न करी ठार   हिरण्यकश्यपूला   ।।१३।।

मृत्यु न यावा शस्त्रानीं  भय नसावे अग्नीपासूनी

टाळावे मरण बुडोनी  ही इच्छा करी राजा   ।।१४।।

दिवस असो वा रात्र   मृत्यु टाळावा मात्र

निष्प्रभ ठरावे अस्त्र    फेकता राजा वरी   ।।१५।।

शिवाचे मिळतां वरदान  राजा झाला बेभान

सामर्थ गेले वाढून   शिवकृपेमुळे   ।।१६।।

सामर्थ्यांत असे शक्ति   शक्ती ओघांत वाहती

ओघास दिशा लागती   परिणाम दिसण्या योग्य   ।।१७।।

२                            मिळतां योग्य मार्ग   होईल चांगला उपयोग

नम्रतेचा असता भाग   मिळालेल्या शक्तिमध्ये   ।।१८।।

दुरुपयोग होता शक्तिचा   दुष्परिणाम दिसेल तिचा

उद्वस्त करी जीवनाचा   केंद्र बिंदू अहंकार असतां   ।।१९।।

पावन करुनी शिववर   जागृत झाला अहंकार

मूळचा होता असूर   हिरण्यकश्यपू   ।।२०।।

गरोदरपणीं नामस्मरण   मंत्र जपूनी नारायण

महान संस्कार करुन   बाळास संगोपिले   ।।२१।।

लागला ईश्वरी ध्यास   सतत प्रल्हाद बाळास

बघे सर्वत्र प्रभूस   रात्रंदिनी   ।।२२।।

गोष्ट येता ध्यानीं   राजा गेला संतापूनी

मजविण श्रेष्ठ नाही कुणी   सांगु लागला प्रल्हाद बाळासी   ।।२३।।

मीच प्रभूचे ठायी    तुझी भक्ति अर्पावी

इच्छा नारायणाची सोडावी    ताकद देई प्रल्हादबाळा   ।।२४।।

नाम नारायणाचे   शब्द ते अंतर्मनांचे

भाव गुंतले ह्रदयाचे   प्रल्हादबाळाचे   ।।२५।।

जन्मबीजाचे संस्कार   सहजतेने न जाणार

बाह्य शक्तीचा करी अव्हेर   प्रल्हादबाळ   ।।२६।।

धमकावले प्रल्हादासी   त्यास जीवे मारण्यासी

चालू ठेवता नामस्मरणासी   नारायणाच्या   ।।२७।।

आत्मा हा अविनाशी   समर्पित झाला नारायणाशी

न देई महत्व देहाशी   प्रल्हादबाळ   ।।२८।।

सर्वत्र सोडता प्रभूवर   काळजी तोच घेणार

संशय नसावा त्याचेवर   समर्पण करते समयीं   ।।२९।।

प्रल्हादाचा हट्ट बघूनी   राजा जाई क्रोधूनी

ठार करण्या ठरवूनी   हूकुम देई प्रधाना   ।।३०।।

पर्वतावरुन लोटले   उकळत्या तेलांत ठाकले

ऐरावताच्या पायीं बांधले   सर्व प्रयत्न जाई निष्फळ   ।।३१।।

प्रभू असतां तारणधारी   कोण त्यास जीवें मारी

राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी   परमेश्वर शक्तीपुढे   ।।३२।।

राजाचा क्रोधाग्नी पेटला   प्रश्न करी प्रल्हादाला

नारायण कोठें  दाखव ?    नाश करीन मी त्याचा   ।।३३।।

हे विश्वची प्रभूमय   अणूरेणूंत तो होय

सर्वत्र समावून जाय   हीच त्याची लीला   ।।३४।।

ईश्वर आहे महान   ब्रह्मांड त्याचा भाग असून

अंशरुपें जायीं समावून   प्रत्येक वस्तूमध्ये   ।।३५।।

महासागरातील नीर   अगणीत थेंबांचा बनणार

थेंबांत सागरी अंश असणार   हे घ्यावे समजावूनी   ।।३६।।

३                            ‘तो नाही’ ऐसे ठिकाण   न सापडेल ते शोधून

तुझ्या माझ्यांत ही तो असून   वास करीत राही   ।।३७।।

नारायण आहे सर्व ठिकाणीं   घ्यावे हे समजावूनी

हया खांबी तो बसूनी   हास्य वदन करी   ।।३८।।

प्रल्हादाचे शब्द ऐकूनी   राजा गेला चवताळूनी

जोरानें लाथ मारुनी   प्रहार केला खांबावरी   ।।३९।।

भयंकर होऊनी आवाज   कडाडून चमके वीज

हिरण्यकश्यपू न येई समज   ह्या चमत्काराची   ।।४०।।

मानव देही सिंह शिर   नखें त्याची भयंकर

गर्जना देत बाहेर   पडला खांबांतूनी   ।।४१।।

रुप आक्रळ विक्राळ   जणु भासला महाकाळ

घाबरुनी सोडी सकळ   ओढूनी घेई असुराला   ।।४२।।

सायंकाळचे समयीं   भयंकर रुप घेई

हिरण्यकश्यपूस मारण्या येई   नारायण   ।।४३।।

बसूनी उंचावरी   घेऊन राजास मांडीवरी

नखानी पोट चिरी   नृसिंह   ।।४४।।

वचनाचे करुन पालन   वरदानाचा ठेऊन मान

नृसिंह आवतार घेवून  ठार करी राजाला   ।।४५।।

डोळे मिटूनी नामस्मरण  ऐकूनी प्रल्हादाचे भजन

प्रसन्न होई नारायण  दर्शन देई विष्णूरुपे   ।।४६।।

प्रल्हाद झाला पावन   प्रभूचे नामस्मरण करुन

भक्तीचा विजय होऊन   अहंकारासी केले नष्ट   ।।४७।।

।।  शुभं भवतु  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२६

जीवनाचे मुल्य मृत्युच्या छायेत जास्त जाणवते

परंतु मृत्युचे सत्य हे जीवनाच्या मायेत विसरते