देव ही संकल्पना
अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवन रचनेचा विचार केला तर हे चक्र जवळ जवळ सारखेच प्रतीत होते. उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रांत जीवनाचा उच्च निचतेचा भाव कोठेच निर्माण होत नसतो. ते निसर्गाला केव्हांच मान्य नाही. प्रचंड उत्क्रांत झालेला मानव हा देखील काळानुसार अत्यंत सुक्ष्म अशा क्रिमी, जंतूचे देखील खाद्य होवून जाते. एक जीव दुसऱ्यावर जगवा हीच तर त्या ईश्वराची मूलभूत कल्पना आहे.
“ जीवः जीवस्य जीवनम ” म्हणतात ते ह्याचमुळे. ईश्वरांनी विचार क्षमता अर्थात ज्ञान ह्याची देणगी मानव जातीला जास्त प्रमाणात बहाल केली. कदाचित त्याची योजना असावी की मानव प्राण्याने निसर्गाच्या दैनंदीन सृजनात्मक क्रियामध्ये त्याला मदत करावी. परंतु झाले मात्र विपरीत. तो त्याच ज्ञान साठ्याचा दुरुपयोग करु लागला. वेगळाच उपयोग घेण्याचे योजू लागला. हेच ज्ञान आपल्या जगण्याच्या समस्या उलगडू शकते. आपल्या अस्तित्वामध्ये श्रेष्ठता ही निर्माण करु शकते. आपल्या इतर सर्व सजीव वा निर्जिवामध्ये आपले महत्त्व, मानसन्मान स्थापित करण्यास मदत करु शकते, हे त्याच्या लक्षात आले. निरनिराळ्या क्लुप्त्या करुन आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, ह्याचा त्याने निरनिराळ्या माध्यमाने प्रयत्न केला . केवळ ज्ञानाच्या जोरावर प्रचंड जगांत, ज्यात डायनोसार, ड्रॅगन, वाघ, सिंह, हत्ती, मगर, अजगर, एनाकोंडा, गेंडा, हिप्पोपोटामस, सर्प, अवाढव्य असे मासे, जलचर प्राणी इत्यादी प्रचंड शक्ती प्राप्त, भयानक प्राणी ह्यांच्यावर संपूर्णपणे ताबा मिळवला. त्यांना अंकीत केले. आपल्या अधिकार क्षमतेमध्ये आणले. परिणाम झाला तो मानव सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरला. हे सारे केवळ विचार ज्ञान संपदेच्या अधिपत्यामुळे. तसा शारिरीक शक्तीमध्ये तो कित्येक प्राण्याच्या तुलनेत अत्यंत कमी पडतो. एखादा क्षुल्लक डास वा क्रिमी किटक देखील त्याला जगणे मुश्किल करु शकतो. शक्ती सामर्थ्यांत तो इतर प्राण्याच्या केव्हांच वरचढ होऊ शकणार नाही. फक्त गनीमी कावा, चकवा तंत्र, विश्वासघात इत्यादी आयुष्याचा तो कौशल्याने उपयोग करतो. केवळ विचार, ज्ञान यांच्या सामर्थ्यांमुळे मात करतो.
विचार व ज्ञानसाठा जेव्हा विकसीत होऊ लागला, तेव्हा त्याला जीवनचक्रांत कोणताही सजीव वा निर्जीव द्वंदात्मक, बरोबरी करणारा, आवाहन देणारा राहीला नाही. सर्वांवर त्याचे वर्चस्व स्थापीत होऊ लागल्यामुळे तो एक अजींक्य असा बनू लागला.
२ परंतु म्हणतात ना, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’
मानवाच्या विचार व ज्ञानश्रेष्ठतेमध्ये त्यालाच आवाहन देणारे, त्याला स्पर्धा करणारे, ह्यालाच वरचढ बनू शकणारे व त्याच्यावरच अधिकार गाजवणआरे, त्याचेच श्रेष्ठत्व हिसकावून घेणारे निर्माण झाले. हा कोणता दुसरा वर्ग, प्राणी व उत्पत्ती नव्हती. तर त्याच्या आपल्याच योनीमधले होते. मानव आता सर्वावर अधिपत्य गाजवित आपसातच संघर्ष करु लागला. मानवप्राणी इतर मानव प्राण्यांशीच झुंज देवू लागला. आता श्रेष्ठत्वाचा गुंता एकदम वाढू लागला. इतरांमधले श्रेष्ठत्व ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हेच श्रेष्ठत्व वैयक्तिकतेकडे जाऊ लागले. श्रेष्ठ कोण “तू का मी” ह्याचे बिज रोवले गेले. एक भयानक प्रचंड ओझे ज्याची बिजे कदाचित सर्वच प्राण्यांचा, विश्वाचा नकाशाच बदलून टाकील. भविष्य काळात प्रचंड उत्पात निर्माण करतील. अशा विचार संकल्पनेची ती बिजे रोवली गेली. त्या बिजांचे नाव होते “तू का मी” आणि पुढे त्याचेच हायब्रिड होऊन फक्त “मीच“ अर्थात “माझेच सारे” मीच श्रेष्ठ ह्या संकल्पनेत. उत्पात माजवला. ह्या एक प्रकारच्या स्वार्थी विचाराने मानव प्राण्यातील श्रेष्ठत्वाची भावना दृढ होऊ लागली. आता ते साध्य करण्यासाठी स्वकीय अर्थात आपलेच लोक, आपलाच समुदाय, समोर येवू लागला. प्राथमिक अवस्थेत त्यांनी निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबिल्या. दोन प्राणी झगडतात तेव्हां हात पाय, दांत, नखे इत्यादी अवयवांचा उपयोग केला जाई, नंतर हातात वस्तू येवू लागल्या, त्यात दगड, लाकूड, लोखंड, तांबे इत्यादी धातू आले. मग कठीण पदार्थ येवू लागले. जस जसे ज्ञान वृधींगत होऊ लागले, शस्त्र यांची निर्मिती होऊ लागली. ह्या सर्वांचा फक्त एकच हेतू असे. तो म्हणजे अधिपत्य, सत्ता, श्रेष्ठत्व स्थापन करणे. एकदा सर्वांहून श्रेष्ठ ही मान्यता मिळाली की मग इतर सर्व काही त्याच्या पाठोपाठ येवू लागते. आजच्या प्रगत व वैज्ञानिक काळामध्ये देखील तीच प्रमुख संकल्पना जीवीत ठेवली जात आहे. श्रेष्ठत्व सत्ता आणि मग जीवनाला लागणारे सारे काही हक्काने, नव्हे शक्तीने प्राप्त होऊ लागले.
रानटी टोळ्या, त्याची आयुधे ह्याचा प्रचंड दबदबा होऊ लागला. शस्त्रांची संकल्पना, योजना परिणाम इत्यादी काळानुसार वाढत गेले. बदलत गेले. साधे, सोपे सरळ परंतु प्रचंड ताकदीची शस्त्रे निर्माण होऊ लागली. “बळी तो कान पिळी“ ह्या तत्त्वाने, शक्ती सामार्थ्य प्राप्त संघटनेकडे सत्ता जाऊ लागली. श्रेष्ठत्व येवू लागले. प्रशासन जावू लागले.
“ज्ञान” ते तर सर्वाहून श्रेष्ठ आहे ना. लहरी रुपामधले अस्तित्व असलेले. आजपर्यंत ह्याच ज्ञानाने महान शक्तीधारण करण्यावर देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. कित्येक व्यक्ती त्या संघटन समुदायात होत्या. परंतु शरिराने अत्यंत अशक्त व भित्रे होते. फक्त विचार ज्ञान यांचा त्या काळानुसार व त्यावेळेनुसार प्रचंड साठा होता. हा शरिराने अत्यंत नाजूक, किरकोळ अशी देहकाठी परंतु ज्ञान प्राप्त होता. शारिरीक शक्तीसामर्थ्यांसमोर ज्ञान सामर्थ्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. शक्तीवान कुणाचेही ज्ञानी समजदार बोल दुर्लक्षीत करीत.
३ आणि एके दिवशी एक घटना घडली. सांज समयी संधी प्रकाशात डोंगरावर प्रचंड ढगांची जमवाजमव दिसू लागली. निरनिराळे आकार, काळे-पांढरे ढग. त्याचवेळी अचानक चमकणाऱ्या विजांचे दिसणे, त्यांच्या रेषामय दिसणे, त्यांचे ढगामधून चंचलतेने होणारे वहन व प्रकाश आणि नंतर प्रचंड आवाज. सारे वातावरण एक भयानक भीती निर्माण करणारे भासत होते. सर्व चकीत होऊन त्याकडे बघू लागले. जे स्वत:ला शक्तीवान, सामार्थ्यवान समजत होते ते देखील त्या अनामिक ज्ञात नसलेल्या निसर्गाच्या एक प्रकारे रौद्र रुपाला घाबरुन गेले. जीवाला मृत्यूची भीती ही तर निसर्गाचीच देण असते. “सुरक्षित जगा वाढत जा आणि आपली योनी वृद्धींगत करीत जा” हाच तर निसर्गाचा मूलमंत्र असतो. तो प्रत्येक सजीव प्राणी त्याचा आधार घेत जगत असतो. सारे दृष्य बघून लोक घाबरुन गेले. त्याचक्षणी त्यावेळी तथा कथीत विद्वान परंतू शरिराने तसे अशक्त पुढे सरसावले. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. ही सारी कोणतीतरी अदृष्य शक्ती आहे. प्रचंड ऊर्जा धारण केलेली आहे. ती सर्वांचे भले करील वा आपणांस नष्ट ही करु शकेल. आपण त्या शक्तीला विरोध न करता त्याला मान्यता देवू या. त्याच्या समोर नतमस्तक होवू या. त्या विद्वानाला सर्वांनी एक मुखाने मान्यता दिली. त्याचे विचार सर्वांना पटले. ह्यात मुख्यत्वेकरुन काही विचार धारा होत्या. जे दिसतं, जे जाणवतं, जे अनुभवले १) ते सार कोणत्यातरी अदृष्य, अज्ञात शक्तीमुळे २) त्याची शक्ती प्रचंड असे ३) ती सर्वांना मदत करेल ४) तिला विरोध केला तर ती सर्वाना नष्ट करेल ५) तिचा आकार, प्रकार बदलणारे असतील. सर्वांनी त्याच्या ह्या संकल्पनेला मान्यता दिली. रानटी वृत्ती मधून सामाजिक संकल्पनेला एक प्रकारे आरंभ होत होता. पुढे अशाच अनेक प्रसंगी अनेक वेळा नैसर्गिक तथा कथीत चमत्कारपूर्ण घटना घडत गेल्या. मग ती आग असो. विजेचे चमकणे असो, धरणीकंप असो, वादळ वारे असो, सुनामी वा समुद्राचे उसळणे असो, ज्वालामुखी असो वा असेच काही. जेव्हां मानव हा भयभीत होत गेला. त्या प्रसंगावर उपाय करण्याची त्याची बौद्धिक पाकळी वा क्षमता विकसित झालेली नव्हती. कोणत्याही प्रसंगाना विरोध न करता सारे मान्य होऊ लागले. नैसर्गिक तत्त्वानुसार जर सर्वच चक्रमय असेल तर हे प्रसंगही चक्रमय होते. ते येथे घडतं, प्रचंडता दर्शवितं, आघात करीत आणि अल्पकाळानंतर निघून जात. सर्व मानव जातीमध्ये एक विशाल चर्चेचा विषय मागे ठेवून ह्यातच दोन गोष्टी झाल्या. देवत्व अर्थात कोणत्यातरी अज्ञात, सामार्थवान, सर्व श्रेष्ठ संकल्पनेचा जन्म झाला. कदाचित वर वर्णिलेला ढगाचा वा विजेचाच प्रसंग असेल असे नाही. असे अनेक प्रसंग काळ व वेळेप्रमाणे घडत गेले. प्रत्येकाला कारण कोणते हे समजू शकले नाही. तशी त्यावेळी प्रगल्भता कमी पडू लागली. हतबलता मात्र प्रामुख्याने दिसू लागली. यातूनच जन्म पावला तो देवत्वाच्या माध्यमाचा. देवत्व हे श्रेष्ठत्व वा सामर्थ्य ह्या अंगाने त्याला मान्यता मिळू लागली. आज देखील आपण जेव्हा कांही प्रचलित संकल्पना व त्यात होणारा काळानुसार बदल लक्षात आणला, तर हे लक्षात येवू लागते.
४ ग्रहणामुळे निर्माण झालेला नैसर्गिक बदल, पृथ्वीवर पडणाऱ्या छाया-पडछाया. या बदलना प्रथम धार्मिक संकल्पनेचा मुखवटा दिला गेला होता. तो राहू, केतू, सूर्य चंद्र, पृथ्वी इत्यादी. लोकांचे भजन, पूजन स्नानादी क्रमे, प्रार्थना इत्यादी हे सारे प्रचंड प्रमाणात व नियमित होत होते. ज्ञानाची वाढ झाली, समज वाढवली, निसर्गाचे चक्र समजले. सारे सारे बदलू लागले. त्या कथांवरील विश्वास कमी होऊ लागला. लोक सत्य घटनेचा आधार मान्य करु लागले. अशाच अनेक संकल्पना देखील त्यांची उकल होऊन मान्यता प्राप्त होऊ लागल्या आहेत. ज्ञान, विद्वानानामुळे परिवर्तन होत असलेले जाणवते.
रानटी काळांत जेव्हा देवत्वाची प्रथम कल्पना कुणीतरी रोवली व ती मान्य होऊ लागली. तेव्हा एक वैचारिक परिवर्तन जाणवू लागले. सशक्त, ताकदवान लोकांनाच श्रेष्ठत्व दिले जाते व त्यांचा अधिकार शक्तीच्या जोरावर मानला जाई. प्रथमच हे घडले. अशक्त किरकोळ परंतु विचार संपन्न व ज्ञानसंपन्न अशा व्यक्तीला महत्त्व दिले जाऊ लागले. कारण त्यानेच त्या नैसर्गिक घटना वा चमत्कारावर भाष्य केले होते. सर्वाना अभय देण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या शक्तीपुढे विनम्र होण्याचे, रानटीपणा बाजूस करण्याचे पटविले होते आणि हे त्याकाळच्या तथाकथीत मुखीयांना पण पटले. त्यांनी मान्यता दिली. हे बघून सर्वजण त्या तथाकथीत विद्ववानाला आदर देवू लागले. नतमस्तक होऊ लागले.
हा वैचारिक बदल, समजण्याची संकल्पना ही त्यावेळच्या समजदार वा ज्ञानी जनांच्या लक्षात येवू लागली. शारिरीक बळ वा शक्तीपेक्षाही नवीन शोधलेला वैचारिक मार्ग हा त्यांच्यावरही श्रेष्ठत्व गाजवणारा असेल ही समज दृढ होऊ लागली. ज्ञानाचे मग त्यात विज्ञान असो वा जामाजिक, कौटुंबिक धारणा विषयी असो. पारडे जड होऊ लागले. सशक्त देखील अशक्तांना मान्यता देवू लागले. विचार व विषय वाढत जावू लागले. जितके विद्वान, तितकेच विषय व समज. लोक जागृती निरनिराळ्या मार्गाने होऊ लागली. सहज झाले असेल वा हेतूपरस्पर घडले असेल. मात्र जे घडले त्याने सामाजिक इतिहास स्थापन होऊ लागला. अशाच त्याकाळच्या तथाकथित विद्वान मंडळीनी अद्रष्य शक्तीच्या मान्यतेचा विचार दृढ करणे सुरु केले. त्याच संकल्पनेतून उत्पन्न झाले आदर तंत्र, विश्वास तंत्र, श्रद्धा योजना, पुजाअर्चा, भजन इत्यादी. मग सर्वच जण त्या अदृष्य शक्तीचे गुणगाण करु लागले. सर्वांचे भले करण्याची त्यामध्ये संकल्पना आहे हा विचार स्थापन होऊ लागला. चांगले विचार, भले विचार, संस्कार, प्रेम, आपलेपणा आणि अशाच अनेक बाबींचा उगम होऊ लागला. अनेक विचार अनेक संकल्पना, अनेक मार्ग हे निर्माण होऊ लागले. निरनिराळे विचार धारक ह्यात सहभागी होऊ लागले. नावे दिली गेली. प्रचार होत गेला.
प्रगती तरी समाधानकारक होती हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. पण याचा मुळ गाभा होता श्रेष्ठत्व, अधिपत्य, सत्ता गाजविणे. जे शरिर शक्तीसामर्थ्याने इतरांना प्रभावित करीत होते. ते देखील अशा विद्वत्तापूर्ण विचारांना मान्यता देवू लागले. आदर देवू लागले.
५ त्यांच्या समोर नतमस्तक होऊ लागले. इतिहास सांगतो की, राजसत्ता ही धर्मसत्तेला प्रचंड महत्व देवू लागली. काहीतरी करुन दाखवण्याची शक्तीप्राप्त लोक हे विचार, कल्पना, भव्यता, दिव्यता इत्यादी संकल्पनाना शरण जावू लागले. ह्यामधूनच एक वर्ग निर्माण झाला. जो आपल्या ज्ञानांनी ज्यात अदृष्य शक्तीची गुणगाण, वर्णन, परिणाम, प्राप्त करण्याची साधने, मार्ग इत्यादी अनेक मार्गाचा उहापोह करु लागला. काही मिळणे वा न मिळणे, प्रयत्नांना यश येवो वा न येवो हे सारे नैसर्गिक सत्य आहे व चक्रमय आहे. परंतु एखाद्या प्राप्त घटनेला कुणाच्या तरी दयेचा, अदृष्य शक्तीची देण ह्या संकल्पनेत घालून विचारांना त्यापद्धतीने मार्ग क्रमण करण्यास प्राप्त केले जाते. तसा विश्वास निर्माण केला जातो. येथेच जन्म होते. श्रद्धा हा संकल्पनेचा. सहजता, साधेपणा, दिव्यता, महानता, चांगलेपणा ह्या कल्पनेला विरोध होत नसतो. ती मानसिकता असते. तीच अशा लोकांनी हेरली आणि आत्मसात केली. आजही असेच शारिरीक अशक्त वा किरकोळ परंतू ज्ञान संपन्न व्यक्ती सर्व समुदायात आपले स्थान प्राप्त करत असतात.
शक्तीचाच नेहमी विजय होत असतो. “ज्ञान” ही पण एक शक्ती आहे. तिने आपल्यापरी अस्तित्व स्थापन केले आहे. मूळ मानसिकता हा नैसर्गिक गुणधर्मात दडलेला आहे. जीवनाची गरज, ती अंकीत राहते. संरक्षणात, अस्तित्वाच्या काळजीत सर्व सजीवाची प्राथमिक गरज असते. ती दिलेले, मिळालेले जीवन जगण्याची “सर सलामत तो पगडी पचास” म्हणण्याची एक वाक्यरचना त्यामुळे आणि त्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. कोणतीही शक्ती तुम्हास तारेल हा विचार मनावर प्रचंड परिणामकारक ठरतो. अर्थात त्या तरण्यातच त्याच अदृष्य शक्तींकडून मिळवायचे असते. त्या जीवनाला लागणाऱ्या गरजा मग ते हवा, पाणी, अन्न ह्या प्राथमिक वा कपडा, घर, संसार इत्यादी जीवनाच्या सोई हे सारे कोणतीही अदृष्य, प्रचंड शक्तीप्राप्त संकल्पनेमधून साध्य होऊ शकते हा विचार मनास आनंद व समाधान देणारा ठरतो. त्यास वैचारिक मान्यता त्वरीत मिळते. त्याच संकल्पनेमधून उत्पती झाली त्या शक्तीच्या प्राप्तीची, आशीर्वादाची, दयेची इत्यादी.
ज्या विद्वान मंडळींना अनेक चांगले, सुंसकृत असे विचार येवू लागले. यांनीच त्यांच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सुचविले. निरनिराळ्या विचार धारा निर्माण होऊ लागल्या. अनेक मार्ग अनेक पंथ इत्यादी त्यामधून उत्पन्न झाले. ज्यांना जशी समज येवू लागली. ते ते त्या त्या विचार धारणेकडे वळू लागले. ह्या सर्वांचा वेगवेगळा परिणाम होऊ लागला. मात्र मूळ गाभा कायमच राहीला. तो म्हणजे श्रेष्ठत्वाचा. प्रत्येक जण आपला विचार श्रेष्ठ, प्रथम, महान, प्रगल्भ इत्यादी असल्याचे सांगू लागले. भासवू लागले. कारण श्रेष्ठत्वात होता अधिकार, सत्ता गाजविण्याची क्षमता.
काही विचार करताना, ह्या विचारांना छेद जाईल अशा कल्पना काढल्या. जशा चांगल्या अदृष्य शक्ती असतात, तशाच त्रासदायक, तापदायक, हानीकारक देखील शक्तींचा ६ उहापोह झाला. भूताटकी, चेटूक, चकवा, भूतबाधा, पिशाच्य, राक्षसी वृत्ती इत्यादींच्या कल्पना पुढे आल्या. त्याच्या भयावह शक्तीसामर्थाच्या वर्णनाने अनेकजण हाबकून गेले. अशा वृत्तींना देखील अंकीत करावे, त्याचीपण दया मिळावी. कृपादृष्टी असावी ही विचारसरणी पण जोर धरु लागली. ह्या साऱ्यांचा वेगळाच मार्ग शेवटी जात होता. आपले श्रेष्ठत्व दुसऱ्यावर स्थापन करण्याचा प्रयत्नात, अनेकजण त्यातही अयशस्वी झाले. चांगले असो वा वाईट, सर्वानाच अंकित करुन स्वरक्षण करुन घेण्यालाच त्यात यश मिळत गेले. अनेक उलाढाली, अनेक घटना अनेक प्रसंग चक्रमय रुपात चालतात. ज्यात उत्पती स्थिती व लय हे सुत्र अबादित आहे. मानवाने आपल्या अहंकारी बुद्धीने त्यात खूप विघ्ने, वितुष्ट, बदल करु घातले. त्या सर्व शक्तीमान निसर्गाला (का परमेश्वराला) आपल्या इच्छेप्रमाणे बदल करण्यास भाग पाडले. जे काही दिसू लागेल, भासले, वाटले ते सारे मिथ्या होत चालले आहे. फार क्षणीक बदल ही तर निसर्गाचीच योजना आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ह्यावर देखील मानव अधिकार गाजविण्याचा प्रयत्न ह्या मधून होता.
समाज आज खूप प्रगती करीत आहे. पुरोगामी बनत चालला आहे. परंतु अशा अनेक विचारांची जी मुळे खूप अनेक अनेक वर्षापासून खोलवर रोवली गेली, ती समुळ नष्ट होणे फार अवघड. अज्ञानात सुख, कल्पनेतील आनंद, भित्र्या मनाला आधार, अनिश्चितेतच समाधान शोधनाचा प्रयत्न होत गेला.
कोणता विचार येथे रुप धारण करीत आहे. जीवनाचे, निसर्गाचे एक महत्त्वाचे ध्येय, श्रेष्ठत्व स्थापणे, अस्तित्वाची जाणीव, हेच. त्यावर श्रद्धा, कालचा विचार, आज पूर्ण वेगळा असेल. अत्यंत विचित्र वाटणाऱ्या, केवळ कल्पना करता देखील न येणाऱ्या सर्व संकल्पना आज सत्यात उतरत आहेत. देव संकल्पना अशीच असावी. कदाचित आपणच देव असूत. देवांच्या सर्व कृती, त्यांच्यावर थोपविली गेलेली अनेक पुराणकथा, ह्या मानवाला साजेशीच असतात. फक्त अनेक चमत्कार दिव्यशक्ती धारणा, ह्या कदाचित आज दिसत नसतील. परंतु प्रगत मानव तेही अनेक मार्गाने साध्य करु लागलेला दिसतो. ज्ञान हे volatile प्रमाणे असते. ते लहरी मध्ये प्रचंड वेग क्षमतेत असते. अस्तित्व रचना इत्यादीमध्ये आमुलाग्र बदल धारण करण्याची शक्ती प्राप्त. मनापेक्षाही प्रचंड ताकदीचे. मन हे देह शरीर माध्यमाचाच आधारावर राहते. मनाला जगण्यासाठी आधार हा शरीराचा. परंतु ज्ञानाला कसलाच आधार लागत नसतो. ते कोठेही, कोणाकडेही केव्हाही जाते, उलथापालथ करणे, वेगळेच होते. कुठले ज्ञान , कुठेही जाणे व त्याच देहातील ऊर्जा शक्तीचा आधार घेत वेगळीच रचना निर्माण करते. ज्ञान हे मनापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ ठरते. माझे विचार, माझे ज्ञान हेच माझे मन म्हणतात. सत्य परंतु ज्ञान जेव्हा स्वतंत्र रुप धारण करते तेव्हा ते तुझे माझे कुणाचेच नसते. तेच तर मनावर देखील ताबा करते वा नष्ट करते.
७ ज्ञानाला तुमच्या शरिराची गरज नाही आणि मोह ही नाही. मनाला तशी गरज असते. म्हणूनच सर्वश्रेष्ठ ज्ञान. काही अंशी ते त्याला साध्य होत आहे. परंतु हे सारे आत्मघातकी ठरणारेच असेल. मानवाची वर्चस्वाची हाव मात्र वाढतच चाललेली आहे. त्याने अनेक क्लुप्त्या करुन आपण त्या निरगुण परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ होण्याचा आव आणला आहे. देवत्वाच्या कल्पना जर मानव प्रेरित असतील, तर त्या सर्व ज्ञान लहरी मधून उत्पन्न झालेल्या आहेत. ज्ञान हे मानवासाठी सदा अपूर्ण असलेले आहे. कारण हाच तर ज्ञानाचा मूळ गाभा आहे. त्यात फरक पडणे केव्हाही होणे नाही. मनावर ताबा करता येत नाही. कारण ही तेच आहे. ज्ञानाचे देखील तसेच नव्हे का. शिवाय मनाला माध्यम लागले. ज्ञानाला तर कोणतेच माध्यम लागत नाही. चांगल मनच चांगल्या ज्ञानाच्या सहकाऱ्यात राहू शकते. समाधान, शांततेचा तोच अंतीम उद्देश असेल.
मानव कोण आहे. ह्याचा विचार होताना, त्याच्या ज्ञानाचा विचार व्हावा, एका रानटी अवस्थेमधूनच तो प्रगत होत होत आजच्या आधूनिक जगातील प्रगतीचा कर्ता ठरला. जे कुणी विचार करु शकणार नाही. ज्या गोष्टीची फक्त वाच्यचा पौराणीक ग्रंथ संपदेत दिसून आली ते सारे काही हाच मानव आज आपल्या ज्ञान सामर्थ्याने करु पाहात आहे. पौराणिक ग्रंथामधील देवत्वाची कल्पना सामान्य मानव करु शकत नाही. ती दिव्य शक्ती ह्या देवदवतांना प्रदान केली होती. अर्थात त्यांच्याच ज्ञान सामार्थ्याने कित्येक तथाकथीत आश्चर्यकारक घटना होत गेल्या. त्यांची वर्णने ऐकून आम्ही अंचबित होऊ लागलो. कारण त्या गोष्टी मानव शक्तीच्या क्षमतेच्या खूपच भिन्न होत्या. मानव तशा गोष्टी केव्हाच करु शकणार नव्हता. देवत्वाचा मोठेपणा, ह्या त्याच्याच भव्यता दिव्यता ह्यात सामावलेला होत्या. मात्र हेच ज्ञान सागर वाढू लागाले. प्रसरण पावू लागले आणि मानवाच्या क्षमतेच्या दिशा खूप दूर दूर जाऊ लागल्या. काळ आणि वेळ ह्यांच्यावर त्याने बऱ्याच प्रमाणात विजय संपादन केला. देवत्वाच्या वर्णनामधल्या जवळ जवळ अनेक बाबी ह्या मानवाने हस्तगत करण्याचा सपाटा चालू केला. ह्याचवेळी देवत्वामधली उर्जाशक्ती व विवेश गुणधर्मावरही मानवी प्रभूत्व दिसू लागले. त्या क्षणी देवत्वाच्या काही संकल्पना लोप पाऊ लागल्या. त्या देवत्वामधून निघून जात आहेत, असा त्याचा अर्थ नव्हे तर त्या सर्व मानवात देखील असल्याची जाणीव होऊ लागली. एक संकल्पना अद्यापी जागृत आहे आणि तो म्हणजे प्रत्येक देवात दैवी शक्तींचे अस्तीत्व असते. ही समज ह्या शक्तीमात्र मानवाने सांघीक पद्धतीने आत्मसात केल्या आहेत. म्हणूनच ते ज्ञान प्रचंड प्रमाणात वाढत असलेले जाणवते. ते कुणा एका व्यक्तीकडून नव्हे. प्रत्येक व्यक्ती ही जरी सक्षम असली तरी त्याची वैयक्तीक चेतना निरनिराळ्या प्रातांत धाव घेवून व्यक्त होत असलेल्या ज्ञानाला वृद्धींगत करते. हे कुणा एका मुळे मात्र नाही. ह्या सर्व सांघीक प्रयत्नात आणि तथाकथीत ज्ञानाच्या निरनिराळ्या दालनांत होत असलेली प्रगती जाणवते. अनेक महान व्यक्ती अनेक प्रातांत अनेक विषयांत जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रगत होत आहेत.
८ ती आपली ज्ञान शक्ती व्यक्त करताना, वृद्धींगत करताना, दिसते. हे फक्त ज्ञानच करु जाणे, मनाला हे कितपत जमेल ह्याची शंका वाटते. कारण ते मन कोणत्यातरी वैयक्तीक देहामध्ये बंदीस्त असते व देहाला नाश होण्याचा शाप आहे. काळ वेळ ह्यांचे मिलन होताच देहधर्म नष्ट होतो. लहरी रुपी ज्ञान छलांग मारीत दुसऱ्या देहांत शिरते व चक्रमय गतीत जाते.
शेवटी पूर्वीचाच प्रश्न समोर येतो व त्याची सोडवणूक पण तशीच होते. हे सारे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच. श्रेष्ठत्वात सत्ता, सत्तेत जीवन जगण्याचे मार्ग हे असतात आणि सारे कशासाठी तर “मी” ह्याच्या साठी
रानटी अवस्थेपासून “मी” चा जो उगम जाणवू लागला तो नैसर्गिक होता व केवळ चांगल्या अस्तित्वासाठी struggle for existence म्हणतात तसे
केव्हा केव्हा मनात विचार येतो की देवत्व कोठे, ह्याच जगांत नव्हे का? ज्याने स्थूलत्व व सूक्ष्मपणा ह्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी केला, नवीन सजीवता निर्माण केली, देह व देहातील अवयावर ताबा केला. ह्याला कोण म्हणावे, पूर्व काळातील देवत्वाच्या सर्व संकल्पना मानवात जर दिसून येत असतील, तर तोच देव असेल का?
ह्याच क्षणी म्हणजे देवाच्या कालसमयी दैत्याची पण संकल्पना होती.
केवळ चांगले व वाईट ह्या भावनांना उचलण्यासाठी देवाबरोबर दैत्याची संकल्पना रुढ केली गेली. आज देखील अनेक व्यक्तींचे आचरण हे दैत्याच्या संकल्पनेत जाते. हे सत्य आहे. म्हणून देव आणि देत्य ह्या दोन्हीही कल्पना आज मानवात दिसून येतात. येथेच स्वर्ग असतो. येथेच नर्क असतो म्हणतात. हे गुढ अर्थानी समजून घेतले पाहीजे. अंगीकारले पाहिजे. ह्यामुळे वैचारिक भरकटने, गैरसमज, गैरविश्वास व अंधश्रद्धा यावर पायबंद पडू शकेल. मानवाच्या ज्ञान प्रगतीमध्ये संस्कारीत, आदर्शवादी, भक्ती प्रेमभरीत, समानतायुक्त भावना अशा मुल्यांची नितांत गरज आहे. दैत्य वृत्तीला जाणून, सर्वांनीच देवत्व होण्याची आज जगाला नितांत गरज आहे. मानवाचा देव व्हावा हीच त्या परम् श्रेष्ठ परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com