Daily Archives: सप्टेंबर 29, 2012

* चुकलेला अंदाज!

*   चुकलेला अंदाज!

रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीला दुर्लक्ष करीत होत्या. नातवंडे कंटाळली होती. शेजारी उभ्या असलेल्या मुलांचे आमच्याकडे लक्ष होते. एक रिकामी रिक्षा आली. त्या मुलातील एकाने पुढे येऊन ती रिक्षा थांबवली. रिक्षावाला थांबण्यास नाखूष होता. त्याला वेळ नाही ही सबब सांगून, आम्हास बागेंपर्यंत सोडण्यास त्याने नकार दिला. आतापर्यंत बघितलेल्या रिक्षावाल्यांची वागणूक क्लेशदायक होती. मुलांचा अहंकार छेडला गेला.  सर्व मुले त्या रिक्षा भोवती जमली. निर्माण झालेल्या परिस्थितीचे  गांभीर्य त्या रिक्षावाल्याने जाणले. वादविवाद न करता, त्याने आम्हास रिक्षात घेतले.

आम्ही बागेच्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात त्या रिक्षावाल्याच्या खिशातील मोबाईल वाजला. रिक्षावाल्याने रिक्षा एक बाजूस घेतली. तो बोलू लागला.

” हं भास्कर ! अरे मी येतच आहे. दहा मिनिटात घरी पोहोचेन. काय म्हणालास घरी येऊ नकोस, का? “   रिक्षावाला त्या माणसाचे ऐकत होता. थोड्यावेळाने   ” बर सर्व समजल, मी सरळच त्या दवाखान्यात येतो. तू थांब आई जवळ.”   रिक्षावाल्याने मोबाईल बंद केला. मागे न वळता तो आम्हास म्हणाला  “ मघाच आमच्या शेजारच्या भास्करचा मोबाईल आला होता. माझी आई घसरून पडली. तिला बरीच दुखापत झाली सांगत होता. म्हणून मी घाईत होतो.”

मी त्याच्याकडे आश्चर्य व निराशेच्या भावनेने बघत होतो.  बाग आली, दाराजवळ त्याने रिक्षा थांबविली. आम्ही सर्वजन व्यवस्थित उतरलो. मी माझे पाकीट काढून, त्याला पैसे देण्यासाठी पुढे जाऊ लागलो. पण क्षणाचाही विलंब न करता, तो रिक्षावाला सुसाट वेगाने निघून गेला. त्याला देण्यासाठीचे पैसे मात्र माझ्याच हाती राहून गेले. मी जड अंत:करणाने त्या रिक्षा कडे, ती नजरेच्या टापूत दिसेपर्यंत बघत राहिलो. माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०