श्रीकृष्ण जन्मकथा

श्रीकृष्ण जन्मकथा

 

श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो   ऐका विनवितो

श्री विष्णु अवतार घेतो    ह्या सृष्टीवर   १

दुष्टांचा होई अनाचार    पृथ्वीते होई पापभार

त्यांचा करण्या संहार    परमेश्र्वर अवतरती   २

कंस राजा दुष्ट    स्वतःस समजे श्रेष्ठ

प्रजेला देई कष्ट    स्वार्थापोटी   ३

छळ करु लागला जनांचा    लुटमार अत्याचार छंद त्याचा

खूनही करी साधूसंतांचा    दुष्टपणे   ४

कंसाची देवकी बहीण    चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन

सात्विक होते तिचे मन    परमेश्र्वराठायीं   ५

देवकीचे लग्न ठरले    वसुदेवाला तिनें वरले

सर्व कार्य पार पडले    कंस राजा घरी   ६

देवकी वसुदेवासंगे बैसली    भोयांनी डोली उचलली

वरात घरी जाण्या निघाली     कंस भावा घरुन   ७

कंस राजा चाले संगे    वरातीच्या मागोमगे

निरोप देण्या तिजलागें    वसुदेव देवकीसी   ८

वरात येता गांव वेशीला    एक चमत्कार घडला

आकाशवाणी झाली त्या वेळेला    चकीत होती सर्वजण   ९

कंस राजा तूं मातला    नष्ट कराया तुजला

विष्णू अवतरती पृथ्विला    देवकीचे पोटी   १०

देवकी वसुदेवाचे आठवे बाळ   कंसाचा तो कर्दनकाळ

योग्य येता वेळ    ठार करील कंसाला   ११

देवकी पुत्र शत्रु माझा   दचकून गेला कंस राजा

विस्मयचकीत झाली प्रजा    आकाशवाणी ऐकूनी   १२

कंसाने विचार केला    देवकीपुत्र जन्मता मारण्याला

बंदीस्त केले त्याना    ठार करण्या बाळ तयांचे   १३

एका मागुनी एक मारीले    सात पुत्राना ठार केले

पापाचे तेंव्हा घडे भरले    कंसाचे   १४

आठव्या वेळी देवकीस   गर्भ राहता नऊ मास

आगळाच होत असे भास    चमत्कार घडला   १५

पृथ्वी पावली समाधान    सृष्टी गेली बहरुन

प्रफूल्ल झाले वातावरण    स्वागत करण्या प्रभूचे   १६

पूर्वीचे सर्व बदलले    दुःखी मन पालटले

रोम रोम ते आनंदले    चिंता न उरली देवकीस   १७

२                            प्रभू आगमनाची तयारी    सर्व देव मिळूनी करती

देवकीस सांभाळी    आपली शक्ती देवूनीया   १८

सुर्य उधळी प्रकाश    वरुण जल शिंपी सावकाश

वायु लहरी फिरती आकाशी    देवकीसाठी   १९

बागेत पसरला सुगंध    वातावरण होई धुंद

देवकीचा आनंद    द्विगुणीत झाला   २०

देवकीचे सारे चित्त    प्रभुचरणी जात

झाली ती निश्चिंत    भार ईश्वरी सोडूनी   २१

श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला     मध्यरात्रीचे सुमाराला

देवकीचे बाळ आले जन्माला        ईश्वर अवतार घेई   २२

सर्व वातावरण शांत    बाळ करी आकांत

परी सर्व होते निद्रिस्त    कारागृहाचे द्वारपाल   २३

थकून देवकी झोपली    बाळ तिचे पदराखालीं

वसुदेवासी चिंता लागली    बाळाची   २४

झाला एक चमत्कार    साखळदंड तुटूनी उघडले दार

विजेमुळे मार्ग दिसे सत्वर    वसुदेवाला   २५

त्वरीत उठूनी बाळ उचलले    तयासी टोपलीत ठेवले

डोईवर ठेवूनी चालले    वासुदेव   २६

वसुदेव चालला    नागराज पाठी आला

फणा काढूनी वाचवी बाळाला    पावसापासून   २७

वसुदेव यमुनाकाठी    दुथडी वहात होती

निश्चयी पाण्यांत शिरती   बाळ घेऊन   २८

पाण्यांत टाकता पाय   यमुना ही दर्शना धाव

ईश्वरचरणीं स्पर्श होय   पावण होणेसी   २९

पाण्याची पातळी वाढली   चरणस्पर्श होता दुभंगली

वाट करुनी दिली    वसुदेवाला   ३०

पैलतिरी गांव गोकूळ    नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ

पत्नी यशोदे झाले बाळ    त्याच रात्रीं   ३१

कन्या होती आदिमाया    ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया

ईच्छित त्याचे कार्य कराया   आली उदरी यशोदेच्या   ३२

घर नंदाचे उघडे   यशेदा निद्रिस्त पडे

लक्ष्य नव्हते कन्येकडे   घरातील लोकांचे   ३३

बाळ ठेवले यशोदेपासी    उचलून घेतले कन्येसी

पांघरुन घालूनी बाळासी   वसुदेव परतला   ३४

मुलीस घेऊन आला    ठेवी देवकीच्या कुशीला

कोण जाणील ह्या लिला    प्रभूविणा   ३५

३                         बंद झाले द्वार पूर्ववत    मुलीने केला रडूनी आकांत

द्वारपाल जागविले त्वरित    ते खबर देई कंसाला   ३६

कंस आला धाऊन    सर्व लष्कर घेऊन

बाळ मारावे म्हणून    आपल्या शत्रुते   ३७

कन्या बघूनी चकीत झाला    कां फसवितोस मजला

शिव्या देत असे प्रभुला    मुलीचे रुप बघूनी   ३८

मुलीस घेतले बळजवरीं    आपटण्या दगडावरी

हात नेता आपले शिरीं कन्या हातून निसटली  ३९

चमत्कार घडला त्या समयीं    कन्या आकाशी जाई

अचानक अकाशवाणी होई    त्यावेळी ४०

आठवे बाळ नंदा घरी    ईश्वर रुप अवतारी

येतां वेळ ठार करी    कंसा तुला ४१

आकाशवाणी ऐकोनी    घडला चमत्कार बघून

कंसा ते कापरे भरुनी    राजगृही परतला ४२

कंस प्रयत्न जाय निष्फळ    विधी लिखीत असे अटळ

कोण रोकती काळ    प्रभूविणा ४३

इकडे यशोदे देखिले    बाळ गोजिरे वाटले

आनंदमय गांव झाले    बाळाचे आगमनें ४४

नांव श्रीकृष्ण ठेविले    नंदाघरी वाढले

गोपाळांत खेळले    आनंदरुप ४५

यशोदाघरी देवकीचे बाळ    ठार केले कंसा येता वेळ

मारले नंतर दुष्ट सकळ    श्रीकृष्णाने ४६

श्रीकृष्णाचा अवतार    दुर्बलांना तो आधार

करसी दुःखाचा निवार    प्राणीमात्रासाठी ४७

जन्माष्ठमीचा उत्सव    ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार

करसी दुःखाचा निवार   प्राणीमात्रासाठी ४७

जन्माष्ठमीचा उत्सव    ओतून त्यांत भक्तीभाव

साजरा करिती सर्व    प्रेमभरे ४८

श्रीकृष्ण सांगे गीता   युद्धभूमीवर असता

कौरव पांडव युद्धा सज्ज होतां    अर्जूनासी ४९

भगवत् गीता महान    ग्रंथ म्हणून मान

जीवनाचे तत्वज्ञान   तयामध्यें ५०

श्रीकृष्णभक्तांनी   वाचावी ही कहाणी

भक्तिरुपें होऊनी    रोज एकदां   ५१

                                               ।। शुभं भवतु  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s