श्री विठ्ठल अवतार

श्री विठ्ठल अवतार

श्री विठ्ठलाचे चरणीं   विनम्र होऊनी

     दर्शन घेई मागुनी    मी तुझा भक्त   १

पुंडलीकास देई दर्शन    नसूनी भक्ती तव चरण

सेवा माता-पित्यांची करुनी    तुजसी पावन केले   २

सेवा आई-वडीलांची करीसी    परी प्रभू पावन झालासी

ही भक्तिची रित कैसी    समज न येई कुणा   ३

तपाचे मार्ग वेगवेगळे    सर्व प्रभू चरणी मिळे

हे कुणास न कळे    प्रभूविना   ४

असोत ती गुरुसेवा    माता पिता वा मानव सेवा

कुणी करी प्राणी सेवा    अर्पण होई प्रभूते   ५

कुणी करती मुर्तीपुजा    कुणी पाही निसर्गांत मजा

प्रभूसी नको भाव दुजा    मनोभावाविना   ६

सत्य आणि तपशक्ती    प्रभूस वाकवती

पाहून पुंडलीक भक्ती    धाऊन आले पांडूरंग   ७

माता पित्याची सेवा    हाच भक्तीचा ठेवा

ती भक्ती खेचती देवा    दर्शन देण्या भक्ताना   ८

मातापिता सेवेचे प्रतीक     मिळोनी धन्य होई पुंडलीक

विश्वाचे उदाहरण एक    प्राप्त करण्या प्रभुसी

भक्तपुंडलीक   कथा त्याची रंजक

होई जीवन सार्थक    करुनी अचरणांत   १०

पुंडलीक होता विलासी    लक्ष्य त्याचे बायकोपाशीं

सर्वस्व समजे धनासी    सुख मिळण्या देहाला   ११

एके दिनी नारदमुनी    गेले उपदेश करुनी

महती आईबापाची पटवूनी    पुंडलीकास   १२

झाली पुंडलीका उपरती    केल्या कर्माचे दुःख होती

पश्चाताप मनी येती    भाव भरले प्रेमाचे   १३

अंधःकार भयाण    जाई दुर होऊन

                                  मिळता एक किरण   प्रकाशाचा   १४

गुरुकडून मार्ग मिळे    ज्ञान झाले आगळे

     भक्तीसेवा ही शक्ती कळे   पुंडलीकासी   १५

मातापित्याची सेवा   हाची पुंडलीकाचा मेवा

सारे जीवन खर्ची पडावा    ही त्याची इच्छा   १६

स्वतःसी गेला विसरुनी    आईबापाची काळजी करुनी

सर्वस्व अर्पिले रात्रंदिनीं    मातापित्यासाठीं   १७

सेवा हेची तप    न लागे नामाचा जप

श्रद्धाभाव आपोआप    यावेमनामध्यें   १८

प्रभू भक्तिचा भुकेला   जातां तप फळाला

दर्शन देई पुंडलीकाला   विठ्ठल रुप घेऊनी    १९

तल्लीन होऊनी सेवा करी   आईबाप झोपतां मांडीवरी

त्याक्षणी पांडूरंग आले दारी    पुंडलीकांच्या   २०

पांडूरंगाचे रुप बघूनी   अश्रुधारा आल्या नयनीं

भावनावश होऊनी   नमन केले प्रभूला   २१

हलविली नाही मांडी   आईवडीलांची निद्रा न मोडी

मनी प्रभुच्या स्वागताची गोडी   पुंडलीकांस पडली   २२

समोर उभे परमात्मारुप   मांडीवरी आईवडीलांची झोप

निद्रामोडता होईल ताप   खंत याची पुंडलीकास   २३

विट घेतली हातीं   विठ्ठलासमोर टाकती

उभे राहण्यास विनविती   विनंम्र होऊनी   २४

क्षमा मागती प्रभूसी    कसे उठवूं आईबांबासी

दुःख त्याचे मनासी    झोप मोडता येई   २५

आई वडील इच्छा करी   जाण्या चंद्रभागेतीरीं

विठ्ठला उभाकरुनी विटेवरी   नदीकाठी गेला पुंडलीक    २६

माता पिताना घेऊन गेला  चंद्रभागेकाठी रमला

विसरुनी जाई विठ्ठला    पुंडलीक २७

पुंडलीक विनंती करी   उभे रहावे विटेवरीं

परतोनी येई तो  चंद्रभागेवरुनी   २८

कर कटेवरी   उभें विटेवरी

लक्ष्य वाटेवरी    पुंडलीकाच्या   २९

आईवडील भक्ती पोटीं   रमला त्यांच्या पाठी

विसरला जगत् जेठीं     पुंडलीक ३०

आजही जाता पंढरपूरीं   विठोबाचे दर्शन करी

दिसेल तो उभा विटेवरी   रुख्मिणीसंगे वाट बघत   ३१

सुर्यचंद्र आकाशी   अथांग तारे नभाशी

येऊन जाती रात्रंदिवशी    हेच चक्र निसर्गाचे   ३२

ऋतु नियमीत येती   मार्ग ते ना बदलती

हीच असे निसर्ग महती   प्रभूशक्तीमुळे   ३३

निसर्गाची नियमितता    हीच त्याची श्रेष्ठता

प्रभूचे अस्तित्व जाणतां   त्या ठिकाणी   ३४

जेव्हां अघटीत घटणा होई   प्रभू त्यांत भाग घेई

तें चक्रची सुरु होई    नियमित रुपे   ३५

भक्तासी पावन झाला   पंढरपूरी प्रभू अवतरला

आषाढी एकादशीला    दर्शन देई पुंडलीका    ३६

ही झाली अपूर्व घटना   परी विचार येई मनां

सुरु होईल नवीन निसर्ग रचना   प्रभूचे अगमन होण्याची   ३७

होता प्रभूचे अवतरण   शक्यता त्याची पुनरागमन

होईल निसर्ग नियमन   हीच महती तिर्थाची    ३८

त्याच स्थळी प्रतिवर्षी    प्रभू अवतरेल त्याच दिवशी

भावना बाळगुनी उराशीं   लाखो जमती वारकरी   ३९

ही निसर्ग किमया    प्रभू अवतरेल जाणूनिया

प्राप्त होईल त्याची दया   ही भावना उराशीं   ४०

चंद्रभागातीरीं पंढरपूर    जैसे काशी गंगातीर

वारकऱ्यांचे माहेर   भक्तांचा जमे मेळा   ४१

विठ्ठल रुखमाई मंदीरीं   दर्शन घेई वारकरी

     तैसैचि पूजा पुंडलीकापरी   भक्त प्रभूसी भजती   ४२

।। शुभं भवतु ।।

 डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s