जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?

ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.

व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.

ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा वा  त्यांच्याकडून करुन घ्यावा ही अपेक्षा.

ज्येष्ठाना अनेक सवलती शासनाकडून दिल्या गेल्या आहेत. आणि मिळतही आहेत.

एक गम्मत बघा. बस वा रेल्वेने प्रवास करा. इतरापेक्षा खर्च कमी.

यात्रीने भरलेल्या बस वा रेल्वेत अचानक शिरा. लोक तुमचा आदर करतात. लोक उठून आपली जागा तुमच्या साठी देऊ करतात. तुमचा चेहरा बघताच ती तुम्हाला मिळते. तो चेहरा असहाय्य वा मागणी करणारा नसतो. तर त्यावर किंचीत हस्याची छटा असते. एक आशिर्वाद देण्याची भावना असते. थोडेसे प्रेम व्यक्त होत असते. तुमच्या चेहऱ्यावर ज्येष्ठत्वाची झलक मात्र असते. ही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असल्याचा शिक्का त्या गर्दीत देखील तुमच्या विषयी आदर निर्माण करतो. शेजारचा विनम्र होऊन प्रेमाने हात धरीत आपले आसन मोकळे करीत तुम्हाला त्या जागेवर बसवितो. हां ! कदाचित् तुमची दुखणारी कंबर, मान, वा गुढगे, तुमचा वाकडा तिकडा करणारा शरिराचा आकार त्याच्या नजरेत आलाही असेल. पण ते कांहीही असो, तुम्हाला सन्मान पूर्वक न प्रयत्न करता, जागा मात्र निश्चीत मिळते.

आहो तुम्ही  बँकेत जा. इतरापेक्षा तुम्हाला जास्त व्याजदर मिळतो. तेथे तर तुमच्याकडे न बघता, फक्त समोरचा कागद बघत, तुमच्या वयाची कदर केली जाते.

केवढे महत्व आहे तुमच्या ज्येष्ठत्वाचे.

अनेक उपाधी (Degrees) असतात. त्या प्रत्येकजण आपल्या जीवनांत मिळवतो. परंतु त्या सहज मिळत नसतात. त्यासाठी अभ्यास, परिश्रम, व मनाचा निश्चय लागतो. मग ते ज्ञान कोणत्याही मार्गाचे असो. B.A., B.SC., B.Ed . L.L.B., M.B.B.S. C.A., B.E., B.Tech. इत्यादी. त्याच प्रमाणे निरनीराळे व्यवसाय ( Jobs) वा नोकऱ्य़ा जसे शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अकॉन्टटंट, इत्यादी  ह्या सर्व त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या उपाधी बनतात. त्यासाठी प्रत्येकाने त्या त्या प्रमाणात परिश्रम घेतलेले असतात. अभ्यास असतो, धडपड असते. कुणीतरी बाजारांत जाऊन त्या खरेदी केलेल्या नसतात. प्रत्येक उपाधी मागे दडलेली असते, त्याची त्या त्या प्रकारची तपश्चर्या आणि यश.

ज्येष्ठ नागरिक बनण्यासाठी मात्र विना श्रम, कांहीही कष्ट न घेता, कोणताही अभ्यास न करता, कोणत्याही परिक्षेला सामोरे न जाता मिळते ही उपाधी, ही डीग्री. आणि तीही अतिशय प्रतीष्ठेची.

कशासाठी ज्येष्ठाना श्रेष्ठ  समजले जाते?

प्रत्येकाच्या पाठीवर एक गाठोडे असते. ते अनुभवाने भरलेले असते व भरत जाते. हे गाठोडे जमा केले असते, जीवन दावावर लाऊन. आयुष्य खर्च करुन. निसर्गाने दिलेली पुंजी गमाऊन. Every thing at the cost of life. हे अनुभव जमा केलेले असतात. ते सहज मिळालेले नाहीत.

इतर प्रांत बदलले जातात. C.A. व्हायचे होत, डॉक्टर झालो. प्राध्यापक व्हायचे होते, वकील झालो. फुट बॉल प्लेयर व्हायचे होते, नट झालो. इत्यादी. जसे श्रम, प्रयत्न, परिस्थीती येत गेली,  व्यक्ती बदलत गेल्या.मार्ग व ध्येय बदलत गेले.  त्यांच्या उपाध्या बदलत गेल्या.

ज्येष्ठत्व मात्र कोणत्याही मार्गाने गेलांत तरी शेवटी ते मिळत गेले. ते सर्वासाठी एकच असते. सर्व उपाध्या मानव निर्मीत असतात. परंतु ज्येष्ठत्व जे प्राप्त होते, ते नैसर्गिक चक्राला अनुसरुन. आणि म्हणुन त्याचे अनन्यसाधारण महत्व असते.

जीवन मृत्युचा सतत लपंडाव चालू असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणा भोवती मृत्यु दबा धरुन बसलेला असतो. ह्याला काळ व वेळ यांचा खेळ म्हणतात. दोघे एकत्र येताच, मृत्यु  जीवनावर झडप घालतो. ते जीवन त्वरीत नष्ट होते. ह्याचसाठी आम्ही जीवनाला अनिश्चीत समजतो. आम्ही केंव्हाही, कोणत्याही क्षणी मरणार ह्याचे आम्हास इतरांचे मृत्यु बघून ज्ञान होते. परंतु मृत्युची जाणीव कुणासही केंव्हाही येत नसते. हा निसर्गाचा आशिर्वाद असतो.  निसर्ग तुम्हास सदैव जागृत राहण्याचा संदेश देत असतो. आम्ही आमच्या मनाच्या sub-conscious  अर्थात जाणीवेच्या  स्थरावर नेहमी सतर्क असतोच. ज्याचे ह्यांत थोडेशे दुर्लक्ष होते, मृत्यु त्यावर त्याच क्षणी घाला घालतो.

तुम्ही बघितले असेल. पक्षी- चिमणी वा कबुतर अंगणांत पडलेले दाणे, एकदम जाऊन टीपत नसतात. प्रथम ते सर्वत्र नजर टाकून मृत्यु कोठे लपलेला आहे कां? ह्याचा मागोवा घेतात. स्वसंरक्षणाची खात्री होताच ते दाणे टिपतात. प्रत्येक प्राण्याच्या जगण्याच्या हलचालीमधून त्याची सतर्कता सतत प्रतीत होत असते. हे त्याच्या सहज अंगवळणी पडलेले असते. एखादी चुक वा दुर्लक्ष त्याचे जीवन चक्र थांबऊ शकते.

माणसाचेही असेच दिसून येते. दैनदीन जीवनांत येत जाणाऱ्या असंख्य संकटा विषयी तो सतर्क असतो.  ती संकटे नैसर्गिक असो वा मानव निर्मीत. जीवाचा बचाव करणे, निसर्गाने जे दिले ते योग्य तऱ्हेने सांभाळणे हे सर्वात त्याचे प्रथम कर्तव्य समजले जाते. आणि प्रत्येकजण स्वतःची त्याप्रमाणे काळजीही घेत असतो. क्षणा क्षणाला मृत्युशी त्याचा संघर्ष होत असतो.

इतका कठीण आयुष्याचा मार्ग तो चालत असतो. आणि एक एक पाऊल टाकीत जेंव्हा आयुष्याची सर्व साधारण मर्यादा जी निसर्गाने अंदाजे १०० वर्षे त्याच्या वाटेला दिलेली असतात, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

अशा भयावह व क्षणा क्षणाला संकटग्रस्त वाटणाऱ्या जीवनाची ५० वर्षे तो जेव्हां पूर्ण करतो, त्याची अर्धी जीवनपाऊल वाट झालेली असते. जवळ जवळ निसर्ग अपेक्षीत कर्तव्ये संपत आलेली असतात. प्रौढत्वाचा टप्पा ओलांडून तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो. त्याच्या ह्या  धडाडीपूर्ण व यशस्वी टप्यालाच ज्येष्ठत्वाची संकलपणा मानलेली असते. त्याचा ज्येष्ठत्वाचा काळ आरंभ झालेला असतो.

जीवनाचे इतर मार्ग जसे Money, Muscle, Spirit, Career. Character, Recommendations, इत्यादी यश मिळविण्यास मदत करु शकतात. परंतु ज्येष्ठत्वाच्या मार्गाला पर्याय नाही. तो एकमेव व निश्चीत आहे.

जे खचकले ते गेले. जीवनाच्या चाकोरीतून हटले. जे टिकले, खंबीरपणे झगडत राहीले, ते जीवन मार्ग चालत राहीले. आज त्याना ज्येष्ठाची उपाधी मिळाली. अनुभव घ्यावा लागत नाही. तो मिळतो. निसर्ग तुमच्या ओंझळीत टाकतो. तुमच्या पाठीवरचे गाठोडे वाढत जाते. ते जेवढे मोठे, तेवढाच सन्मान मोठा.

१०० वर्षे जे पुर्ण करतात त्याना शतायुषी ही उपाधी सन्मानाने दिली जाते. ज्या ज्येष्ठानी  ९० ते ९५ वा १०० ह्या वयाचा टप्पा गाठलेला आहे,  काय वेगळ त्यानी केल ?  ते जीवनाशी संघर्ष करीत राहीले. प्रत्येक क्षण मृत्युच्या भोवऱ्यांत गुंतलेला असतना, जीवन क्षणभंगुर असताना. ते जागृतपणे जगले. व यशस्वी झाले. मृत्यु केंव्हा व कसा घाला घालील अनिश्चीत असते. प्रत्येक क्षणाबरोबर, वातावरणाबरोबर, तुमचा सतत संघर्ष चालू असतो.

एक प्रकारचा लढा. जे जगले ते केवळ त्यांत यश मिळत गेले म्हणून. निसर्ग नेहमी जीवन मृत्युची दोन्हीही दारे उघडी करुन तुम्हास मार्ग दाखवित असतो. तुमची सतर्कता तुम्हाला जगवित असते. जीवन पुढे पुढे जाण्यात मदत करीत असतो. आपले ज्येष्ठत्व हे लढा करुनच आपण मिळविले आहे. म्हणूनच हा ज्येष्ठत्वाचा सन्मान.

येथे एक महत्वाची बाब सर्वांसमोर आणू इच्छीतो. जीवनाची वाटचाल जरी खडतर दिसत असली तरी मानवाने आपल्या बुद्धी व ज्ञान याच्या साहाय्याने तीलाच पूर्णपणे बदलून टाकलेले आहे. ते जीवन आता आनंद देणारे, हवे हवेसे वाटणारे, सुलभ, आशादायी, करमणूक प्रधान बनलेले आहे. तरी मृत्युच्या चकरा जीवनाभोवती चालूच असतात

(ललित लेख)

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s