असेही एक गणेश विसर्जन
अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएक वास्तू खरेदी केली. गणेश चतुर्थीचा दिवस होता. पुजेची पुस्तके, कॅसेट, सी.डी. आणि इतर पुजेचे साहित्य तेथील भारतीय दुकानामधून मिळाले. छोट्या छोट्या गणेशच्या मुर्ती पण १० ते १२ डॉलर्सपर्यंत उपलब्ध होत्या.
नव्या घरांत छोटीशी गणेश मूर्ती आणली गेली. तिकडेही महाराष्ट्र मंडळ स्थापन झालेले आहेत. मंदीरे आहेत पूजाअर्चा अथवा आन्हीके सांगणारे भटजी देखील आहेत. फक्त तुमची इच्छा हवी. भटजीच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना, आवाहन, पूजन, आरती, प्रसाद इत्यादी सर्व धार्मिक सोपस्कार कुटूंबीय आणि मित्रमंडळी ह्यांच्या परिवारांत पूर्ण केल्या.
दिड दिवस सर्वानी आनंद उपभोगला. गणेश विसर्जनाची वेळ आली. तेंव्हा मात्र सर्वाना एक वेगळाच मार्ग अवलंबावा लागला.कारण चौकशी करता कळले की स्थानिक शासकीय आदेशा प्रमाणे कोणत्याही तलावांत मुर्त्या, निर्माल्ये, वा इतर कोणत्याही पूजाविधीमधल्या वस्तूंचे विसर्जन करण्यावर बंदी होती. नियमांचे उल्लंघन झाल्यास जबरदस्त शिक्षेची तरतूद होती. तेथील त्या परिस्थितीला उपाय नव्हता. तेथील मुलांच्या ग्रुपने सारे नियम व बंधने आनंदाने मान्य केली. एक मोठा टब आणला व स्वच्छपाण्याने भरला. सर्वजण खूप नाचले, गायले. प्रथम खूप जल्लोश केला. आनंद व्यक्त केला. श्री. गणेशाचा जयजयकार केला. पूजा आरती झाली. गणपतीबाप्पा मोऱ्या, पुढल्या वर्षी लवकर या ह्या गर्जनेच्या नादामध्ये त्या गणेशाचे त्याच टबमध्ये विसर्जन केले गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला म्हणत सर्वजण प्रसाद घेऊन गेले.
आठ दिवसांत त्या पाण्यांत गणेशमुर्तीचे खऱ्या अर्थाने विसर्जन झालेले जाणवले. आतां तीच पवित्र माती व पवित्र पाणी घरातील अंगणामधल्या फुलझाडांना पद्धतशीर टाकले गेले. दररोज सकाळी उमललेल्या टपोऱ्या फुलाकडे बघून त्यांचा आनंद तर द्विगुणीत होऊ लागला. गणरायाच्या पाऊलखूणा ह्या त्या सुंदर फुलांमध्ये डोकावीत आहेत, असा भास होत असे.
(ललित लेख)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
छान लिहिले आहे
पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा!
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
प्रिय प्रशांत रेडकर
धन्यवाद अभिप्रायाबद्दल.
.अशानेच लेखनाची प्रेरणा मिळते.
आभारी. डॉ. भगवान नागापूरकर