Daily Archives: जून 1, 2011

त्यागवृत्ति

त्यागवृत्ति

जीवनाच्या सांज समयीं

उसंत मिळतां थोडीशी

हिशोब केला स्वकर्माचा

वर्षे गेली होती कशी

दिवसामागून वर्षे गेली

नकळत अशा वेगानें

सुख दुःखाच्या मिश्रणीं

जीवन गेले क्रमाक्रमानें

आज वाटे खंत मनीं

आयुष्य वाया दवडिले

ऐहिक सुखाच्या मागे जातां

हातीं न कांहीं राहीले

‘ घेणे ‘ सारे आपल्यासाठीं

करीत जीवन घालविले

‘ देण्या ‘  मधल्या आनंदाला

मन सदा वंचित राहिले

सुधारुन घे आतां तरी

अनुभवाने चूक आपली

उर्वरित वर्षे जाऊं दे

त्यागवृत्ति मध्यें सगळी

भोगातले सुख कसे ते

क्षणांत येवून क्षणांत जाई

त्यागातील समाधान परि

उशीरा लाभून सदैव राही

(कविता)