बाळाची निद्रा
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
कविता