माईल स्टोन्स ( Mile Stones )

माईल स्टोन्स ( Mile Stones )

श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळू गोळा करुन खेळत होता. वसंतरावांचे लक्ष लहान मुलाकडे जाताच, ते रागाने ओरडले. “चिंतू काय घाणेरडेपणा चालवला आहेस ? ” लाल विटांचे तुकडे घेऊन ते कुटून बारिक करीत होता. सारे हात पाय व कपडे त्याने लाल रंगाने माखून टाकले होते. वसंतरावांचे ओरडणे काकाना आवडले नाही. त्यानी वसंतरावाना शांत राहण्याची खूण केली. व तो लहान मुलगा चिंतू जे खेळत होता, ते तसेच खेळू दे हे सुचविले. परंतु वसंतरावाना ते रुचले नाही. आरे काय हे घाणेरडे खेळणे. अश्याच वाईट सवयी मुलाना ह्याच वयांत लागतात. व ती पुढे बेशिस्त होतात. ते काकांना समजावू लागले. काका हासले. ” वय आहे त्यांच असेच खेळ खेळू दे त्याला. त्याच्या कल्पनेनेच तो हे सारे करीत आहेना खेळू दे त्याला.” वसंतराव बेचैन झाल्याचे वाटत होते. काका हे सारे टिपत होते. ” तुला मी एक गम्मत सांगतो. तुझ्या मोठ्या मुलाला सांग की तू तूझ्या लहान भावाबरोबर तसांच खेळ व करमणूक कर. ये निशी जा आणि चिंतू बरोबर तसाच खेळ. ” निशी उठला. त्याने ते कॉमिक पुस्तक बाजूला ठेवले. व तो चिंतू जवळ आला. विटांचे कुटून पिठ काढणे व त्यांत खेळणे हे निशीला आवडले नाही. तो क्षणभर ते बघून पून्हा आपल्याच जागी गेला. व तेच पुस्तक चाळू लागला. जीवनमार्गाचा जर आलेख काढला तर त्यावर टप्या टप्याने जीवनांत शारीरिक व मानसिक बदल होत असलेला जाणवतो. ह्याला माईल स्टोन्स Mile Stones अर्थात जीवन मार्गातील मैलांचे दगड म्हणतात. ह्या खूणा तुमची जीवन पद्धती, वैचारीक जडन घडन कशी बदलत जाते. ह्याचे वर्णन करते. जन्म, बालपण, तारुण्य, प्रौढ वय, म्हातारपण, आणि मृत्यु ही जीवनाची सर्व साधारण प्रत्येकाची पाऊलवाट असते. म्हणूनच ह्याला जीवन आलेख म्हटले गेले आहे. त्याच आलेखाचा जेव्हां विस्तार केला गेला, तेव्हां प्रत्येक पायरीचा विचार समोर येतो. लहान सहान हलचाली, फरक, वेगळेपणा, वाढ, प्रगती ह्या अंगाची नोंद ह्यांत केली गेल्याचे जाणवते. आवडी निवडीचा वयाच्या वाढीव चक्राशी खूपसा संबंध असतो. सभोवतालच्या परिस्थितीतून व्यक्ती सहसा तेच उचलून घेतो, जे निसर्ग त्याला शिकवतो. निसर्ग सदा वय ( शारीरिक/मानसिक), वाढ आणि वातावरण (सभोवताल ) ह्याच्या त्रिकोणातच त्याला बंदिस्त करुन त्याचे व्यक्तीमत्व तयार करीत असतो. आवडी निवडीची मुभा मात्र त्याने प्रत्येकाला दिलेली असते. म्हणूनच वाढ सारखी परंतु व्यक्तीमत्वामध्ये फरक हा दिसून येतो. चिंतूला आवडणारे खेळ खेळण्याचे वय आतां निशीमध्ये राहीले नाही. वयाच्या थोड्याशा अंतराने आवडी निवडीचा आलेख बदलून गेला. आवड आणि बदल हा जीवन वाढीचा प्रमुख गाभा असतो. त्याचमुळे जीवनाचे अनेक रंग उधळताना व्यक्ती आनंदाच्या व समाधानाच्या सतत शोधांत असतो. आगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

(ललित लेख)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s