Daily Archives: मार्च 11, 2011

परमेश्वराचे स्वरूप -२

परमेश्वराचे स्वरूप  -२ 

त्या परमेश्वराचे स्वरूप कसे असेल ?  हा सर्वसाधारण विचार येत होता. वाचन,मनन आणि चिंतन करीत गेलो. ध्यान धारणेत लक्ष दिले. जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळाले त्याने सर्व प्रश्न तर सुटले नाहीत, परंतु बरेचसे समाधान- आनंद-व शांतता मिळाली.

            परमेश्वर अनंत, अविनाशी, संपूर्ण आणि सर्वत्र चराचरामध्ये पसरलेला आहे. त्याचे हे वर्णन सर्वांनी एकमुखाने मानले आहे. त्याचे स्वरूप आकाराने वर्णन केलेले नाही. तो निराकार निर्गुण आहे. जे सगुण रूप वर्णन केले ते केवळ मनाच्या केंद्रीत होण्यासाठीचे लक्ष्य म्हणून. प्रचंड चंचल असलेल्या मनाला एका बिंदूत, ध्येयात वा लक्ष्यात स्थीर करण्यासाठी.

            कोणताही पदार्थ सूक्ष्म वा स्थूल स्वरूपात त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त अशा शक्तीसह (उर्जा) असतो. पदार्थ व त्यातील उर्जा हे एकरूप असतात. अवलंबून असतात आणि तरीही स्वतंत्र कार्य व अस्तित्वात असतात. घरामध्ये अनेक उपकरणे जसे दिवे, पंखे, हिटर, मॅक्रोवेव्ह, फ्रिज, ए.सी. टि.व्ही इत्यादी असतात. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. परंतु सर्वांचे कार्य चालते ते त्याच्यातून जाणाऱ्या विजेमुळे. विज ही उर्जाशक्ती आहे. विजेला तीच्या अस्तित्वासाठी पदार्थ अर्थात माध्यम लागते. विज आणि पदार्थ हे एकमेकास पुरक असतात. विज उपकरणांना फक्त शक्ती देते. उपकरणांनी कोणते कार्य करावयाचे हे त्यांचे गुणधर्म होत. जसे हवा, थंडी, गरमी, उजेड, छाया इत्यादी कोणी कोणते कार्य करावे हे त्या कार्याची असलेली शक्ती (उर्जा) ठरवित नसते. परंतु कार्यकारण्यासाठी ती लागते हे सत्य.

            मानवी देहांची अशीच संकल्पना आहे. अनेक उपकरणांप्रमाणेच देहांमध्येहही अनेक इंद्रिये आहेत. अवयवे आहेत. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. उपकरणांच्या कार्यासाठी जशी विज वा शक्ती लागते. त्याचप्रमाणे देहाच्या इंद्रियाच्या कार्यासाठी देखील शक्ती (उर्जा) लागते. हीला जीव वा जीवातत्मा म्हटले गेले आहे. स्वतंत्र असून देखील दोन्ही देह आणि जीव हे निराळे. त्यांचे अस्तित्व एकमेकांच्या विना असू शकत नाही. देह आहे तर जीव व जीवासाठी देह समजले जाते. तरीदेखील जीव वा जीवात्मा हा फक्त शक्ती, उर्जा, चैतन्य शरीराला देतो. शरीरांनी कोणते कार्य करावयाचे त्याची योजना व परिणाम ह्यासाठी शरीर स्वतंत्र असते. जीवाचा शरीराच्या कार्याशी तसा संबध नसतो.

            प्रत्येक मानवाला निसर्गाने जन्मत: अनेक इंद्रिये दिलेली आहेत. ती आपल्यापरी कार्यारत असतात. उदा. मेंदू. एक प्रमुख इंद्रिय. सर्व शरीरावर त्याचा ताबा असतो. मन, बुध्दी हे भाग मेंदूमध्येच. शारीरिक कार्य (physical activities) आणि मानसिक कार्य (psychological activities) ह्यावरचे संपूर्म नियंत्रण मेंदूमार्फतच होत असते. वासना आणि आसक्ती (Attachment)अर्थात दोन्ही एकच म्हणून (synonymous). हे गुणधर्म निसर्गानेच उत्पन्न केलेले आहेत.

देहाला ज्या गोष्टीची ओढ ह्याला वासना म्हणतात व देहानी अंतरंगात अनुभवलेल्या  गोष्टीची ओढ ह्याला (Attachment) आसक्ती म्हणतात. दोन्हीही गोष्टीचा संबंध मन-बुध्दी अर्थात त्या देहाच्या मेंदू ह्या प्रमुख अवयवाशी येतो. अतंरंग आणि बाह्यरंग ह्यात उत्पन्न होणाऱ्या चेतना मेंदू हा संपर्कात येताच ग्रहण करतो व त्याची साठवणूक करतो.

            ह्यालाच आम्ही विचारांच्या आठवणी म्हणतो. कंप्युटरला ज्याप्रमाणे फीड केले जाते त्याप्रमाणे तो सर्व विचारांची फोल्डर वा फाईलमध्ये साठवणूक करतो. कंप्युटरचे कार्य चालण्यास प्रमुख मदत असते ती विजेची. कंप्युटर काय व कसे साठवणूक करतो, कसे कार्य करतो ह्याच्याशी विजेचा संबंध नसतो. देहसुध्दा वासना (वा आसक्ती) ह्यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विचारधाराप्रमाणे मेंदुमार्फत कार्य करतो. देहाच्या वा त्यातील इंद्रियाच्या गरजेनुसार वासना उत्पन्न होतात. परंतु मेंदु (अर्थात बुध्दी) ह्या वासनांचे विश्लेषन करून योग्य वा अयोग्य परिणामांचा विचार केला जातो. नंतर इंद्रियामार्फत ते कार्य होते. वासना-आसक्ती हे जरी नैसर्गीक गुणधर्म असले तरी त्याच्या उत्पन्नाचे परिणामाचे मार्गदर्शन बुध्दी अर्थात मेंदू करतो. निसर्गाचे वरदान व योजना आहे की कुणी काय करावे. तुमचा अनुभव, बुध्दी अर्थात conscionsness जागृतता यांत तुमची साथ देते आणि यालाच कार्य म्हणतात. त्यामुळे कर्माचे स्वरूप हा सर्वस्वी बुध्दी वा मेंदूचा अधिकार असतो. जीवात्मा देहाला उर्जा देतो, शक्ती देतो. ज्यामुळे देह कार्य करू शकतो. तो त्या कार्याच्या स्वरूपात व नंतर होणाऱ्या परिणामात (कार्यफळ) संबधीत नसतो. निसर्गाने देहाला त्याच्या इंद्रियाना आंतरबाह्य अनुभव घेणे व कार्य करणे ह्याचे परिपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.

            जीव (जीवात्मा) ज्याला उर्जा म्हणतात तीच त्या परमेश्वराचे अंशात्मक स्वरूप आहे. सर्व विश्व, जगत हे त्याचे भव्य दिव्य स्वरुप आहे. त्याची अंशात्मक अस्थित्वाची जाणीव चराचरामध्ये पसरलेली अनुभवते. कम्पुटरवर काम करताना एक अनुभव आला, ५० फोल्डर्स स्क्रिनवर वेगवेगळे डिस्ल्पे झालेले होते. प्रत्येकाला ऍक्टीव्हेट करून सिलेक्ट केले गेले. प्रत्येक स्वतंत्र्य व वेगळ्याप्रमाणे ऍक्टीव्हेट झाला. कोपऱ्यात एक नवीन एम्टी फोल्डर तयार केलेले होते. त्या ५० फोल्डर्सपैंकी एकाला हलविताच सर्व फोल्डर्स एकमेकांशी बांधले गेलेले जाणवले. एकाला ड्र्याग करून Empty फोल्डरमध्ये टाकताच, सर्व ५० फोल्डर्स त्या नव्या फोल्डरमध्ये टाकले गेले. अशाच प्रकारे सर्व देहांचे जीवात्मे त्या परमात्म्याशी बांधले गेलेले असतात. किंवा परमात्म्याच्या विश्वात पसरलेल्या उर्जारूपी शक्तीमध्येच सर्व पदार्थ सजीव वा निर्जीव वास करतात. सर्व काही एक हेच ते परमेश्वरांचे स्वरूप नव्हे काय? इथे बघणे, जाणणे नव्हे तर फक्त अनुभवने हेच महत्त्वाचे. मला मीच अनुभवने म्हणजेच ते परमेश्वराचे दर्शन होय.   

(ललित लेख)