Daily Archives: नोव्हेंबर 1, 2010

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला
शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला
 
जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती 
झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती
 
किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे 
रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.
 
विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर
राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर 
 
पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे     
पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते
 
संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी
परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी
 
घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर 
आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार 
 
सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे
कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे
 
फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती 
मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती  
 
चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना    
शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना 
 
गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे 
आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे  
 
वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली
अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली
 
चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची 
लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची         
 
(  कविता )