जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली. सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले.
अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती. त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे, नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता दोष त्या नवबालीकेचा ? जन्मताच तिला तिच्या जन्मदात्या आईने तिला टाकून दिले. जगात जगण्यासाठी लढण्याचा संदेश देवून, ती माय मावूली निघून गेली. तिच्या सर्वतो वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले गेले. मुल वाढू लागले. शुश्रुषा करणाऱ्यानी तिचे नाव दुर्गा ठेवले. कुणाचे प्रारब्ध् कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्या लहान बालिकेच्या ललाटी जे निसर्गाने लिहिले तेच तिला मिळणार. हे सत्य आहे.
एक दिवस एक प्रौढ जोडपे रुग्णालयात आले. त्यांना मुलबाळ नव्हते. त्या मुलीला ते दत्तक घेवू इच्छित होते. स्थानिक श्रीमंत शेतकरी कुटुंब घरदार व स्वत: गेली दहा वर्षे अमेरिकेत New Jersey येते मोठ्या कंपनीत अधिकारी होते. भारतात दर दोन वर्षांनी येत असे. चर्चा झाली. त्यांनी कायदेशीर अर्ज केला. सर्व संबंधित शासकीय यंत्रने मार्फत परवानग्या मिळाल्या. मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. तीच मुलगी करोडो रुपयाच्या संपत्तीची कायदेशीर मालक बनली. ह्याला काय म्हणावे? निसर्गाची एक विचित्र परंतु आकर्षक खेळी. हृदह्याला भिडणारी जीवनकथा.
सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला. दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो, Washington येथील President’s White House बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते कल्पनातीत होते